कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संपूर्ण राज्यात ब्रेक दी चेन अंतर्गत कडक निर्बध लागू केले आहेत. त्यामुळे जनतेला शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाने दिले आहेत.
कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सामान्य जनतेला शिवभोजन थाळी हा मोठा आधार ठरत आहे. शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टाॅरेंटला पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरुपात दिली जात आहे. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन जनतेने करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या दरात कुठलाही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच पाच रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी ब्रेक दी चेन या मोहिमेंतर्गत काही कडक निर्बंध लागू केल्यामुळे आता शिवभोजन केंद्रावरही थाळी पार्सल सुविधेच्या माध्यमातून मिळणार आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
बॉक्स
लाभार्थ्यांची होणार अडचण
गरीब आणि कामगार यांच्यात ही योजनाही आतापर्यंत सर्वच केंद्रांवर सोशल डिस्टन्स, सॅनिटाईझ करून सेवा देत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पार्सलचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे लाभार्थ्यांची अडचण होणाऱ्या शिवभोजन केंद्रावर ताट देण्यात येते. पार्सल सुविधेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे जेवताना गैरसोय होणार आहे. पिशवीतून गरम जेवण देता येणार नाही. जेवण जास्त वेळ पिशवीत राहिल्यास खराब होण्याची शक्यता आहे. केंद्रावर पाण्याची उपलब्धता असते. पार्सल सुविधा पाणी मिळणार नाही. यावर पर्याय देण्याची मागणी होत आहे.