-----------
अमरावतीत ३०० रुग्ण, दुसऱ्या लाटेत उफाळला आजार
फोटो - २८एएमपीएच०८, २८एएमपीएच०९
लोकमत विशेष
गणेश देशमुख
अमरावती - ‘एनिथिंग कॅन हॅपन इन कोराना एक्सेप्ट प्रेग्नंसी अँड फ्रॅक्चर’ - कोराेनावर उपचार करणारी येथील डाॅक्टर मंडळी आपसात बोलताना विनोदाने हे वाक्य उच्चारतात. अमरावतीत ते तंतोतंत खरे ठरते आहे. काेरोनामुळे आता एक डोळा कायमचा निकामी होत असल्याची धडकी भरविणारी अनेक प्रकरणे अमरावतीत समोर येत आहेत.
वैद्यकीय सूत्रांनुसार, हा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. या आजाराला ‘म्युकरमायकाॅसिस’ म्हणतात. हा शब्द काहीसा परिचित असला तरी त्यातून डोळा गमविल्याची प्रकरणे नवी आहेत. दुसऱ्या लाटेत ती चिंताजनकरीत्या पुढे येऊ लागली आहेत. काेरोना होऊन गेलेल्यांना हा आजार होतो. कोराेनाकाळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे त्याचे मुख्य कारण. सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही ओढवतो. मृत्यूदर ६० टक्क्यांपर्यंत आहे.
सर्जरीसाठी तज्ज्ञांच्या चमूची गरज
संक्रमणानंतर सर्जरी गरजेची ठरते. त्यासाठी ईएनटी, डोळे, दातांचे शल्यचिकित्सक आणि मेंदूविकारतज्ज्ञ यांची चमू आवश्यक आहे. आयसीयू सेटअपमध्ये सर्जरी करावी लागते. यशस्वी सर्जरीनंतरही ३०-४० टक्के रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत.
अमरावतीत ३०० रुग्ण
या रुग्णांची स्वतंत्र आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. तज्ज्ञ डाॅक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार, अमरावतीत २० नेत्रतज्ज्ञ आहेत. आठवड्यात प्रत्येकाकडे १०-१२ रुग्ण येताहेत. २२ ईएनटी सर्जन आहेत. त्यातील १५ खासगी प्रॅक्टिस करतात. आठवड्याला प्रत्येकाकडे पाच-सहा रुग्ण येतात. या अंदाजानुसार दुसऱ्या लाटेत सरासरी ३०० रुग्ण आढळून आले आहेत.
लक्षणे काय?
वरच्या पापणीला सूज, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, वस्तू दोन दिसणे, नाकावर सूज, नाक बुजणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, दातांमध्ये, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणे आहेत.
- तर संक्रमण नियंत्रण शक्य
संक्रमण सुरुवातीलाच थांबविले जाऊ शकते. परंतु, आरंभकाळातील लक्षणे नेहमी जाणविणारी डोकेदुखीसारखी सामान्य लक्षणे असल्याने ती रुग्णांच्या लक्षात येत नाहीत. तपासणीला आलेल्यांबाबत डाॅक्टरांना शंका आल्यास एन्डोस्कापी, सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांतून संक्रमण शोधता येऊ शकते; तथापि ती पद्धती खर्चीक असल्याने सरसकट उपयोगात आणता येत नाही, अशी अडचण डाॅक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली.
----------
यांना अधिक धोका
रोगप्रतिकारशक्ती मुळात कमी असणाऱ्यांना, एचआयव्ही, कर्करोग, अनियंत्रित मधुमेह असलेल्यांना धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अँन्टिव्हायरल आणि स्टेराॅईड द्यावेच लागतात. या औषधींनी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. कोरानानंतर त्यामुळे हे संक्रमण होते.
----
कोट
२५ वर्षांत मी या आजाराचा एकही रुग्ण बघितला नाही. दुसऱ्या लाटेत १०-१२ रुग्ण तपासून झाले. डोळ्यांपर्यंत हे संक्रमण पोहोचते त्यावेळी डोळा वाचविणे अशक्य असते. दोन्ही डोळे गेलेले रुग्णही मी बघितले.
- डाॅ मनीष तोटे, नेत्रशल्यचिकित्सक, अमरावती.
-----------
कोट
संक्रमण वाढलेल्या अवस्थेत बुलडाण्याहून आमच्याकडे दाखल झालेल्या एका कोविड रुग्णाचा डोळा निकामी झाला. या आजाराला ‘ब्लॅक फंगल डिसिज’ही म्हणतात. यात मृत्युदर ६० टक्क्यांपर्यंत आहे.
- डाॅ. रोहिणी यादगिरे, आयसीयू तज्ज्ञ, अमरावती
--------
कोट
पहिल्या लाटेत हे रुग्ण नव्हते. दुसऱ्या लाटेत अचानक प्रमाण वाढले. आठवड्यातून ५-६ रुग्ण मी तपासतो. अनेकांना सर्जरीची गरज पडली. पूर्वी हे रुग्ण क्वचितच दिसायचे. आता ते विदर्भभरात आहेत.
- डाॅ. बबन बेलसरे, ईएनटी सर्जन, अमरावती
----------
कोट
एक्स्पर्ट टीमच्या उपस्थितीत अलीकडे ‘म्युकरमायकाॅसिस’च्या आठ सर्जरी सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये केल्या. अमरावतीत खासगी डाॅक्टरांच्या मिळून ६०-७० सर्जरी झाल्या आहेत. आता हे रुग्ण सर्वत्र आढळताहेत.
- डाॅ. श्रीकांत महल्ले, ईएनटी सर्जन, सिव्हिल हाॅस्पिटल, अमरावती
--------