शुक्रवारी करार : परदेशातूनही काढता येणार कागदपत्रेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अत्याधुनिकतेची कास धरली असून लवकरच डिजिटल लॉकर्स प्रणाली सुरु होणार आहे. त्याकरिता २१ जुलै रोजी सदर एजन्सीसोबत विद्यापीठ करारनामा करणार आहे. कुलगुरु चांदेकर यांच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी उपलब्धी मानली जात आहे.विद्यापीठ सार्वजनिक कायद्यानुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी-सुविधा देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत. त्यानुसार विद्यापीठांची वाटचाल अपेक्षित आहे. शासन आणि केंद्रीय अनुदान आयोगाच्या धोरणानुसार विद्यापीठांनी पेपरलेस कारभार स्वीकारणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने डिजिटायझेशनकडे वाटचाल सुरु केली आहे. आता विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यापीठात येण्याची गरज नाही. नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातून सुद्धा दुय्यम कागदपत्रे काढता येतील. त्यासाठी डिजिटल लॉकर्स प्रणाली सुरू केली जात आहे. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसाठी ‘ई-पेमेंट’करताच डिजिटल स्वाक्षरीच्या आधारे दुय्यम शैक्षणिक कागदपत्रे त्यांना बसल्या ठिकाणी मिळतील. डिजिटल लॉकर्स प्रणाली सुरु करण्यासाठी २१ जुलै रोजी विद्यापीठ ‘नॅशनल अॅकॅडमी डिपॉझेटरी लिमिटेड’ या एजन्सीसोबत संयुक्त करारनामा करणार आहे. ही काढता येतील कागदपत्रेशासनधोरणानुसार विद्यार्थ्यांची कागदपत्रे तिजोरीत सुरक्षित राहतील. ‘डाटाबेस मॅनजेमेंट’च्या धर्तीवर डिजिटल लॉकर्स प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दुय्यम कागदपत्रे आॅनलाईन दिली जातील. याप्रणालीत सुरूवातीची दोन वर्षे म्हणजे मार्च २०१९ पर्यंत कोणतेही शुल्क न आकारता दुय्यम कागदपत्रे विद्यार्थ्यांना आॅनलाईन मिळू शकतील. विद्यापीठाने सन २००१ ते २०१३ या कालावधीतील विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड संगणकीकृत केले आहे. यासाठी उपकुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. दुय्यम गुणपत्रिका, दुय्यम पदवीप्रत, प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र, डिजिटल फॉर्म, पदवी व्हेरिफिकेशन आदी महत्त्वाची कागदपत्रे याप्रणालीच्या माध्यमातून काढता येतील. नव्या प्रणालीद्वारे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या दारी नेले आहे. त्यामुळे आता कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार नाही. आॅनलाईन शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळविता येतील.- जयंत वडते, संचालक, परीक्षा मंडळ व मूल्यमापन विभाग, अमरावती विद्यापीठ.
आता विद्यापिठात ‘डिजिटल लॉकर्स’ प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:09 AM