( श्यामकांत सहस्त्रभोजने )
बडनेरा : पूर्वी आषाढात लग्न वर्ज्य होते. शास्त्रामध्ये चतुर्मासात लग्न सोहळ्याला नकार आहे. आषाढात साधारणतः शुभकार्य टाळली जातात. मात्र, कोरोना महामारीमुळे लोकांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. अशा परिस्थितीत मुहूर्ताची तिथी आटोपल्यानंतरही शुभ दिवस पाहून आता आषाढात ‘शुभमंगल सावधान’ केले जात आहे.
यंदा १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांत अनेक लोक आषाढ, श्रावणात शुभदिवस पाहून लग्न सोहळे पार पाडीत आहेत. वाढती लोकसंख्या, मर्यादित मंगल कार्यालये आणि महामारी यांसारख्या अडचणीमुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सोईचा शुभ दिवस पाहून लग्नसोहळे आटोपले जात आहेत. यंदा जुलै महिन्यात २५, २७, २८, २९, तर ऑगस्टमध्ये ९, ११, १३, १४, १९, २०, २३, २४, २७, ३०, ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. या तारखांवर बऱ्याच ठिकाणचे मंगल कार्यालय बुक आहेत. कोरोनामुळे लांबलेले विवाह सोहळे आषाढात पार पडत आहेत. अलीकडे मुहुर्ताशिवाय सोईनुसार विवाह सोहळे केल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
---------------------
मंगल कार्यालये बूक
आषाढात विवाह करू नये, असे शास्त्र सांगते. अलीकडे त्यामध्ये बदल पाहावयास मिळतो आहे. बऱ्याच लोकांना त्यांच्या अडचणीमुळे मुहुर्ताचे दिवस साधता येत नाही. त्यामुळे लग्न मुहुर्ताची शेवटची तारीख आटोपल्यानंतरही काही शुभ दिवस असतात. त्यावर लग्न सोहळे केले जात आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत शुभ दिवस आहेत. बरीच लहान-मोठी मंगल कार्यालये लग्न सोहळ्यासाठी बूक असल्याची माहिती मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडून मिळाली. बरेच लोक आपल्या घरीच लग्न सोहळा करीत आहेत.
--------------------------
परवानगी पन्नास लोकांची पण...
कोरोना महामारीमुळे शासन प्रशासन स्तरावर लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांचीच उपस्थिती निश्चित करण्यात आलेली आहे. काही लग्न सोहळे नियमांचे काटेकोर पालन करून पार पडले. मात्र, काहींनी नातेवाइकांचा रोष टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंडपात बोलवून आपल्या मनासारखे विवाह सोहळे पार पाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही लग्न सोहळे नियम डावलून प्रचंड गर्दीने झाले. काहींना प्रशासनाच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागले.
------------------------------
आषाढात शुभ तारखा......
१) यंदा आषाढात १५ जुलै ही लग्न मुहूर्ताची शेवटची तारीख होती. त्यानंतर २० नोव्हेंबरलाच लग्न मुहुर्ताची पहिली तारीख आहे. वधू-वर पित्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अडचणींचा विचार करून लांबलेले विवाह सोहळे शुभ दिवस पाहून पार पाडले जातात.
- रमेश तेलंग, पुरोहित, अमरावती.
2) आषाढ, श्रावणात शुभ दिवसांच्या तारखा पाहून मुलामुलींकडील लोक लग्न सोहळे करतात. कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना लग्न सोहळे पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा १५ जुलैपर्यंतच लग्नाचे मुहूर्त होते.
- दत्तात्रय राहाटगावकर, पुरोहित, बडनेरा.
---------------------------