लूक बदलले : पोलीस चौकी, विविध विकास कामांचे सोमवारी लोकार्पणअमरावती : येथील शिवटेकडी (मालटेकडी) येथे ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाणार आहे. त्याकरिता नव्याने पोलीस चौकी स्थापन केली जात असून शिवटेकडीवर साकारलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोमवारी २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती महापौर चरणजितकौर नंदा यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.शिवटेकडी ही ऐतिहासिक वास्तू असून आता दरवर्षी येथे ‘शिवटेकडी महोत्सव’ साजरा केला जाणार आहे. त्याकरीता महापालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात या महोत्सवासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. शिवटेकडीवर नाना- नानी पाकणर, खुले रंगमंच, ग्रीन गार्डन जीम, व्यायाम शाळा, रेन गन, पानपोई, एक कि. मी. माती ट्रॅक, ११ विद्युत एलईडी खांब, १६ सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचा शुभारंभ केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस चौकीतून चालणार आहे. येथे ये- जा करण्यांची पोलीस नोंद ठेवणार आहे. शिवटेकीचे पावित्र्य साबूत ठेवण्यासाठी लाखो रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या स्थळावर वेगळा अनुभव, आनंद मिळावा, याकरीता महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सोमवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, महापौर चरणजितकौर नंदा, खासदार आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. यशोमती ठाकूर, आ. श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, बाजार समितीचे सभापती सूनील वऱ्हाडे, उपमहापौर शेख जफर, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, गुंफाबाई मेश्राम, माजी महापौर वंदना कंगाले आदी उपस्थित राहणार आहेत. विकासकामांच्या लोकार्पणानंतर संगीत रजनी हा बहारदार कार्यक्रम होईल, असे महापौर नंदा म्हणाल्या. पत्रपरिषदेला महापालिकेचे पदाधिकारी हजर होते.महापालिकेचे उद्यान विभागाचे कार्यालय हे आता शिवटेकडीवर स्थलांतर केले जाईल. शिवटेकडीवर दूरध्वनी, आकाशवाणीचे कार्यालय असून ही वास्तू महापालिका ताब्यात घेईल. या वास्तूत उद्यान विभागाचे कामकाज सुरू केले जाणार आहे.
आता शिवटेकडीवर प्रत्येकांची पोलिसात नोंद
By admin | Published: January 25, 2016 12:29 AM