गणेश वासनिकअमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. पायांचे ठसे, ट्रॅपिंग कॅमेरे आदी पारंपरिक पद्धतीदेखील व्याघ्र गणनेची वैशिष्ट्ये राहणार आहेत.व्याघ्र गणना राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य, नवेगाव बांध, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य आणि सह्याद्री अभयारण्यात होणार आहे. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि जंगल क्षेत्रात व्याघ्र गणना केली जाईल. जीपीएस एक-ट्रॅक ही प्रणाली पहिल्यांदाच वापरली जात असल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पात अधिका-यांच्या एका तुकडीला प्रशिक्षण देण्यात आले. ही तुकडी त्यांच्या क्षेत्रातील अधिकारी, कर्मचा-यांना व्याघ्र गणनेबाबत प्रशिक्षण देणार आहे.राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. यापूर्वी २०१४ मध्ये व्याघ्र गणना झाली. आता त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये होत आहे. दोन टप्प्यांत गणना होणार असून, पहिल्या टप्प्यात ट्रॅपिंग कॅमेरे, तर दुस-या टप्प्यांत पाच दिवस जीपीएस एम-ट्रॅकद्वारा गणना केली जाईल. यात दरदिवशी वनरक्षकांना ३०, तर वनपालांना २० किमी पायी प्रवास करणे अनिवार्य केले आहे. वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा, शिकारीचे प्रकार आदींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर राज्यनिहाय गणनेची माहिती दिल्ली येथील एनटीसीएकडे पाठविली जाईल.व्याघ्र गणनेत वनविभाग, वन्यजीव, एनटीसीए, डब्ल्यूआयआय, एनजीओंचा सहभाग राहील. जीपीएस एम- ट्रॅक हे अत्याधुनिक यंत्र वापरासाठीचे प्रशिक्षण पेंच व्याघ्र प्रकल्पात ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान देण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत अधिकारी, कर्मचा-यांना १८, १९, २० डिसेंबर रोजी गणनेबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या व्याघ्र गणनेची तारीख अद्यापही निश्चित झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.जीपीएस एम- ट्रॅकची वैशिष्ट्येजंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनकर्मचा-यांना जंगलात पायी गस्त घालण्याची सक्ती आहे. वनरक्षक ३०, तर वनपालांना २० किमी अंतर दरदिवसाला कापावे लागते. जीपीएस एम- ट्रॅक अॅप्लिकेशनमुळे कोणी, किती अंतर गाठले, हे क्षणात कळते. हीच प्रणाली व्याघ्र गणनेसाठी वापरली जाणार आहे.व्याघ्र गणनेसाठी पहिल्यांदाच जीपीएस एम- ट्रॅक अॅप्लिकेशन वापरले जात आहे. त्याकरिता अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गणनेसाठी पारंपरिक व अत्याधुनिक यंत्रणेची जोड दिली आहे.- निशांत वर्मासंचालक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, दिल्ली.
आता व्याघ्र गणनेसाठी जीपीएस एम- ट्रॅक, जानेवारीत दोन टप्प्यांत होणार गणना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 5:33 PM