अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध मार्गावर पॅकेज टुर्स आयोजित केले आहेत. याचाच एक भाग म्हणून पर्यटनस्थळ व देवदर्शन विठाई बससेवा दर शनिवार व रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकाहून साेडली जाणार आहे.
परिवहन महामंडळाकडून थेट अमरावती ते चिखलदरा ही दर्शन बस दर शनिवारी सकाळी ७ वाजता सोडली जाणार आहे. या दर्शन बसद्वारे चिखलदरा येथील भीमकुंड, गाविलगड, देवी पॉईंट, मोझरी, बगीचा, पंचबोल आदी ठिकाणी पर्यटकांना ने-आण करणार आहे. याकरिता २६५ रुपये प्रवासभाडे आकारले जाणार आहे. सकाळी ७ वाजता निघालेली ही बस सायंकाळी ६.३० वाजता अमरावती बसस्थानकावर परत येणार आहे. याशिवाय अमरावती ते शेगावकरितासुुुुुुुुद्धा वरील दिवशी दोन फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाहून शेगावकरिता जाणारी पहिली बस सकाळी ७ आणि दुसरी बस ८ वाजता सोडली जाणार आहे. सकाळी ११ वाजता ही बस शेगाव येथे पोहोचणार आहे. त्याच दिवशी ही बस प्रवाशांना घेऊन ३.३० वाजता आणि दुसरी बस ४.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या बसचे प्रवासी भाडे ६०० रुपयाप्रमाणे आकारले जाणार आहे. या बसने जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना देवदर्शन व खासगी कामे आटोपून दिलेल्या वेळेवर संबंधित ठिकाणच्या बसस्थानकावर हजर राहावे लागणार आहे. महामंडळाने खास भाविक भक्त आणि पर्यटकांच्या सुविधेकरिता थेट चिखलदरा व शेगावकरिता थेट एसटी बस नवीन वर्षात म्हणजेच २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे याकरिता आरक्षणासाठी सुविधाही महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
बॉक्स
चिखलदरा पर्यटनवारीचे वेळापत्रक
मध्यवर्ती बसस्थानकाहून सकाळी ७ वाजता सुटेल. चिखलदरा येथे पोहोचल्यानंतर भीमकुंड पॉईंटवर सकाळी ९.३० ते १० वाजता पोहोचेल, गाविलगड १०.१५ ते ११.१५ वाजता, देवी पॉईंट ११.३० ते १२ वाजेपर्यत, १२.१५ ते १२.४५,मोझरी पॉईंट, बगीचा १ ते १.१५ जेवणाची विश्रांती आणि पंचबोल पॉईंट ३. ते ३.३० व दुपारी ४.१४ वाजता परत अमरावती याप्रमाणे पर्यटन बसचे वेळापत्रक महामंडळाने जारी केले आहे.
कोट
महामंडळाने अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून पॅकेज टुर्स सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत दर शनिवार व रविवारी थेट चिखलदऱ्याकरिता एक आणि शेगावकरिता दोन विठाई बसेस सोडल्या जाणार आहेत. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा
श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रण