(गणेश वासनिक)
महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.
अमरावती : अनाथ मुले १८ वर्षांची झाली की, त्यांना ते राहत असलेल्या अनाथ आश्रमात राहू दिले जात नाही. या वयात ही मुले-मुली आपल्या पायांवर उभीदेखील झालेली नसतात. यामुळे अनाथ मुला-मुलींचे वय २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना आश्रमात राहता येईल, असा निर्णय राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने घेतला. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
अनाथ मुला-मुलींना वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत राहू द्यावे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांची होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत अनाथ मुला-मुलींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.
कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत १९५ मुले अनाथ झाली आहेत, आई व वडील गमावलेली १०८ बालके, तर एक पालक गमावलेली ८७ बालके आहेत.
-------------------
कोविडमुळे एकूण अनाथ
१९५ मुले
एक पालक गमावलेली - ८७ मुले
दोन्ही पालक गमावलेली - १०८ मुले
--------------------
सगळ्यात जास्त अनाथ मुले -
नंदुरबार - ९३
हिंगोली - १८
जालना - १६
गोंदिया - १२
ठाणे - ११
-----------------
या जिल्ह्यातही अनाथ झाली मुले
पालघर - ०२
रत्नागिरी - ०२
परभणी - ०४
सिंधुदुर्ग - ०२
पुणे - ०४
धुळे - ०३
जळगाव - ०७
अहमदनगर - ०८
वाशिम - ०२
यवतमाळ - ०१
बुलडाणा - ०३
नागपूर - ०७
-------------------------
कोविडच्या काळात मुले, महिलांचे प्रचंड हाल झाले. काही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे अशा मुलांचे जिल्हास्तरावर टास्क फोर्सच्या माध्यमातून संगोपन, समुपदेशन करण्यात येणार आहे. अनाथालयात २३ वर्षांपर्यंत मुले राहू शकतील, असा निर्णय घेतला आहे.
- यशेामती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री,