अमरावती : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्याअनुषंगाने नवीन अमरावतीरेल्वे स्थानकाला पिंक स्टेशन घोषित करण्यात आले आहे. आता रेल्वे स्थानकावर ‘महिला राज’ असणार असून, महिनाभरात या निर्णयाची अंमलबजाणी होणार आहे.
अमृत योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाता असताना आता काही रेल्वे स्थानकाचा ‘ए टू झेड’ कारभार महिलांकडे सोपविला जाणार आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत अमरावती अकोली येथील नवीन अमरावती रेल्वे स्थानक तर नागपूर मध्य रेल्वे विभागांतर्गत अजनी रेल्वे स्थानक पिंक स्टेशन घोषित करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात अमरावती रेल्वे स्थानकावर आवश्यक असलेला महिला अधिकारी, कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली जाणार आहे.
भुसावळ डीआरएम पांडेय यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर नवीन अमरावती रेल्वे स्थानकाला गुलाबी रंगांनी प्रकाशमय करण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांनी अगोदर अमरावती रेल्वे स्थानकावर १०० फूट उंच तिरंगा ध्वज उभारला आहे. प्रवाशांसाठी नवीन एफओबी, दोन लिफ्ट, रेल्वे कोच रेस्टारंट, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प, मेळघाटचे वैभव दर्शविणारी भित्तिचित्रे लक्ष वेधणारी ठरत आहेत.
गुलाबी रंग अन् महिलांकडे धुरा
अमरावती रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लागणाऱ्या आवश्यक सोयीसुविधा, रेल्वे गाड्यांचे आरक्षण, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, संगणक कक्ष, पार्सल सुविधा, स्टेशन प्रबंधक, तिकीट निरीक्षक, सफाई कर्मचारी, विश्रामगृहाचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था यासह अमरावतीचे रेल्वे स्थानक पिंक करण्यात येणार आहे. एकंदरीत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मॉडल रेल्वे स्थानकाचे नियंत्रण असणार आहे.
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या महत्प्रर्यासाने अमरावती येथे मॉडेल रेल्वे स्थानक साकारण्यात आले. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना अमरावती माॅडेल रेल्वे स्थानक पिंक घोषित करण्यासाठी यापूर्वी पत्र दिले होते. त्यानुसार आता पिंक स्टेशन घोषित झाल्यामुळे अमरावती रेल्वे स्थानकाचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. ही अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब ठरणारी आहे.
- नवनीत राणा, खासदार, अमरावती.