अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात राबविली जाणार आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय व वार्डस्तरीय पथकांनी स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झालीत. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन अनेक महिला विधवा झाल्या आहेत. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन करणे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांंना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. दोन्ही पालक गमावून निधन झालेल्या बालकांना एकरकमी ५ लाख अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून योजनेचा लाभ संबंधितांना देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य उपक्रम आहे.
बाॅक्स
तालुकास्तरावर समिती गठित
मिशन वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती गठित करण्यात येत आहे. तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष आहेत. बीडीओ, बीईओ, तालुका विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद सीईओ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टीएमओ, विस्तार अधिकारी, समाज कल्याण, पशुसंवर्धन अधिकारी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, तालुका संरक्षण अधिकारी, विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंमसेवी संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य, तर बालविकास प्रकल्प अधिकारी सचिव राहणार आहेत.
बॉक्स
विविध योजनेतून लाभ
कुटुंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस, प्रमाणपत्र, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला, जातीचे दाखले, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश फी, घरकुल आदी योजनांचा लाभ मिळून दिला जाणार आहे.