जितेंद्र दखणे - अमरावतीनिवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांना सांभाळून प्रत्येक घरापर्यंत शुभेच्छा पोहोचविण्याचे जिकरीचे काम उमेदवारांनी केले. आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल, ती फक्त निवडून येणाऱ्या आमदारांचीच. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांनी दिवाळी असल्याने नवीन आमदार आणि प्रचारामुळे दिवाळे निघालेल्या उमेदवारांना ही दिवाळी कायमची स्मरणात राहणारी ठरणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच उमेदवार शड्डू ठोकून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याचा आवाज आपल्या मतदारसंघात यावा यासाठी पदयात्रा, प्रचारफेऱ्या, घरोघरी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हा आवाज घुमविण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपण्याचे महत्त्वाचे कामही उमेदवारांना करावे लागत आहे. कार्यकर्त्यांना जपणे म्हणजे प्रत्येकाची सायंकाळची सोय करणे आलेच. दिवसभर मतदारसंघात फिरण्यासाठी शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या वाहनांमध्ये इंधनाची सोय करणे, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना इंधनासह वाहन उपलब्ध करुन देणे आणि वर खर्चाला पैसे देण्याचे कर्तव्य उमेदवारांना पार पडावे लागत आहे. हा खर्च भागवताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत.राजकीय डावपेचांचा भाग म्हणून प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी काहींनी अपक्षांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या खर्चाबरोबर त्या अपक्षांचाही खर्च उचलवा लागत आहे. याशिवाय ‘बोली’ केल्याप्रमाणे भेट द्यावी लागते ती वेगळीच. मात्र, विधानसभेला पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्यांना त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते खर्चाला ‘मागेपुढे पाहू नका’ असे म्हणून पैसा खर्च करण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे उमेदवारांचा आजचा दसरा तर उत्साहात साजरा होईल; परंतु निकालानंतरची दिवाळी कशी जाईल? हे सध्या तरी सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की निवडून येणाऱ्या आमदारांची दिवाळी मात्र जोरात साजरी होणार आहे.
आता आमदारांचीच दिवाळी!
By admin | Published: October 08, 2014 10:58 PM