गणेश वासनिकअमरावती, दि. 7 - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्र गणनेसाठी नवे अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानुसार पुढील वर्षी होणा-या व्याघ्रगणनेसाठी आतापासून देशभरातील 42 व्याघ्र प्रकल्पांतील संगणकतज्ज्ञांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे वाघांच्या मोजणीअंती जाहीर होणा-या आकडेवारीच्या बनवेगिरीला आता लगाम बसेल.देशपातळीवर वाघांची अधिकृत संख्या किती, याची शहानिशा करण्यासाठी दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. यापूर्वी सन 2014 मध्ये व्याघ्रगणना करण्यात आली होती. आता सन 2018मध्ये देशात वाघांची मोजदाद करण्यासाठी व्याघ्रगणना होणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आतापासूनच तयारी चालविली आहे. वर्षभरानंतर होणा-या व्याघ्रगणनेचा डाटा व्यवस्थित संकलित राहावा, यासाठी नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी संगणकतज्ज्ञांना योग्य ते मार्गदर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे. केंद्र शासनाने वाघांचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रसह अन्य राज्यांतील व्याघ्र प्रकल्पात एनटीसीएने पत्र पाठवून व्याघ्रगणनेची पूर्व तयारी करण्याचा सूचना दिल्या आहेत. व्याघ्रगणनेअंती वाघांची सविस्तर माहिती गोळा करून ठेवण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरचा वापर होणार आहे. हे नवे सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी संगणकतज्ज्ञांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रीय संचालकांवर सोपविली आहे. विभागीय स्तरावर संगणकतज्ज्ञांना नवे सॉफ्टवेअर हाताळण्याचे योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वी व्याघ्रगणनेअंती जाहीर आकडेवारीनुसार देशात 3,216 वाघांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात 249 वाघ असून, ताडोबा, मेळघाट, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच, सह्याद्री, टिपेश्वर, बोर अभयारण्यात वाघांची नोंद आहे.‘‘व्याघ्रगणनेचा ‘डाटा’ गोळा करून ठेवण्यासाठी नवे सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. त्यानुसार संगणकतज्ज्ञांना पुढील वर्षी होणा-या व्याघ्रगणनेच्या अनुषंगाने प्रशिक्षित केले जाईल.-गिरीश वशिष्ठ,उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर
व्याघ्रगणनेसाठी आता नवे ‘सॉफ्टवेअर’, बनवाबनवीच्या आकड्यांना बसणार लगाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 4:54 PM