अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी होताच नागरिकांचा लसीकरणाबाबतचा उत्साह कमी झालेला आहे. त्यामुळे योजनेची गती वाढविण्यासाठी एनजीओचाही सहभाग घेण्याचे महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावित आहे. याबाबत लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
महापालिकेद्वारा रोज १५ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. सध्या लसींचा पुरवठा समाधानकारक आहे. त्यातही ऑफलाईन लसीकरणही ५० टक्क्यांवर केल्या जात आहे व दोन्ही प्रकारच्या लसी उपलब्ध असतांना नागरिकांचा सहभाग मात्र, कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी काही सामाजिक संस्थांनी लसीकरण शिबिर घेण्याची अनुमती महापालिका प्रशासनाला मागितली होती. त्यांना परवानगी देण्याचे प्रशासनाचे प्रस्तावित आहे. या प्रकारात नोंदणीसाठी महापालिकेची यंत्रणा ठेवून लसीकरण केल्या जाऊ शकते, असे सांगण्यात आले. एकूणच लसीकरणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात १४,४७,०३० नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. यामध्ये १०,१९,५७८ नागरिकांनी पहिला व ४,२७,४५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,४५,१२० डोस प्राप्त आहेत. यामध्ये ११,४२,३३० कोविशिल्ड तर ३,०२,७९० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत.
बॉक्स
लसीकरणाची जिल्हा स्थिती
जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंट लाईन वर्कर ३९,६१०, फ्रंट लाईन वर्कर ६९,०२१, १८ ते ४४ वयोगटात ५,१२,८७६, ४५ ते ५९ वयोगटात ४,४९,३३५ व ६० वर्षावरील ३,७६,१८८ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. अद्याप १०,१९,५७८ नागरिकांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. १८ ते ४४ वयोगटातील सर्वाधिक नागरिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.