गणेश वासनिक, अमरावती : राज्यात १३ अकृषी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिकेचा एकच पॅटर्न असणार आहे. विद्यापीठांत परीक्षा प्रणाली ही सेमिस्टर पद्धतीची लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेवर श्रेणी आणि गुण अशा दोन्ही बाबी नमूद असतील, असा प्रस्ताव उच्च व शिक्षण विभागाने तयार केला असून, तो राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.पुणे येथे उच्च व शिक्षण संचालक कार्यालयात राज्यातील १३ विद्यापीठांचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक आणि सीईटी सेलचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी समान गुणपत्रिकेच्या विषयावर विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी मते नोंदविली आणि प्रस्तावित परीक्षा प्रणालीची माहिती सादर केली. दरम्यान, उच्च व शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिका समान असावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षांसाठी सेमिस्टर पॅटर्न लागू झाला. त्यामुळे गुणपत्रिकेवर श्रेणी आणि गुण अशा दोन्ही बाबी नमूद करूनच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देणे अनिवार्य आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्याला अंतिम वर्षाची गुणपत्रिका देताना यात श्रेणी नमूद होती. त्यामुळे या विद्यार्थ्याला नेमके किती गुण मिळाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशास अडचणी निर्माण झाल्यात. परिणामी त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायासाठी याचिका सादर केली. या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला विद्यापीठांमध्ये गुणपत्रिकेचा पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी आता अकृषी विद्यापीठांमध्ये युद्धस्तरावर केली जाणार आहे.
शासन निर्णयाची प्रतीक्षा मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमात सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतील त्रुटींमुळे सर्वच विद्यापीठांमध्ये एकच गुणपत्रिकेच्या पॅटर्नची अंमलबजावणी केली जाणार आहे. डिजिटल आणि सेमिस्टर प्रणालीमुळे हे शक्य आहे. यापुढे गुणपत्रिकेवर श्रेणी आणि गुण अशा दोन्ही बाबी नमूद असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके किती गुण आणि कोणती श्रेणी आहे, हे गुणपत्रिकेवरून स्पष्ट होईल. उच्च व शिक्षण विभागाने प्रस्ताव ब तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. मात्र, आता याबाबत शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. पुणे येथील उच्च शिक्षण संचालकांकडे झालेल्या बैठकीत आता अकृषी विद्यापीठांमध्ये गुणपत्रिका एकाच पॅटर्नची असावी, असे शिक्कामोर्तब झाले आहे. हा प्रस्ताव पुढील निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठविला जाईल. एकदा शासनाने मान्यता दिली की याची अंमलबजावणी विद्यापीठांमध्ये सुरू होईल. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ