- गजानन मोहोड
अमरावती : राज्यात ५३ बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने राज्य सहकार निवडणूक प्रधिकरणाद्वारा निवडणूक घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलांनुसार आता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यंदा सर्व प्रचलित मतदरासंघ रद्द करण्यात आल्याने प्राधिकरणाच्या निर्देशांप्रमाणे संबंधित बाजार समिती क्षेत्राची समान १५ गणांत विभागणी करण्यात यावी, असे निर्देश प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत.राज्यात एकूण ३०७ कृषिउत्पन्न बाजार समिती आहे. यापैकी ५३ बाजार समित्यांमध्ये लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये १९ बाजार समित्या विदर्भातील आहेत. या सर्व ठिकाणी नियम २०१७ अन्वये बदल करण्यात आल, तर १६ डिसेंबरच्या आदेशानुसार निवडणूक होणार आहे. यासाठी संबधित जिल्हाधिका-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी असे प्राधिकरणाने घोषित केले आहे. यासर्व बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्राची आता समान १५ गणांत विभागणी करून, त्यापैकी पाच गणाचे लॉटरी पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात किमान १० आर जमीन क्षेत्रधारणा केलेल्या व वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या शेतक-यांची मतदार यादी तयार करून संबंधित बाजार समित्यांच्या सचिवाला देण्याच्या सूचना प्राधिकरणाचे आयुक्तांनी केल्या आहेत. बाजार समिती कार्यक्षेत्राचे समान १५ भागांमध्ये विभाजन करताना पाच गण आरक्षित राहणार आहेत. यामध्ये दोन महिलांसाठी, एक अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक जागा विमुक्त भटक्या जमातीसाठी राहणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव गण लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार असल्याचे आयुक्यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भातील १८ बाजार समित्यांमध्ये धुमशाननागपूर जिल्ह्यातील काटोल, हिंगणा, कळमेश्वर, रामटेक, नरखेड, नागपूर व कामठी, यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा, दारव्हा, बोरी, पुसद, उमरखेड व दारव्हा, चंदपूर जिल्ह्यात पोभुर्णा, गडचिरोली, गोंदिया तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, मलकापूर व सिंदखेडराजा या बाजार समित्यांमध्ये नव्या सुधारणांनुसार निवडणूक होत आहे. याव्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यात दोन, नाशिक तीन, नंदूरबार चार, पुणे एक, सोलापूर तीन, औरंगाबाद दोन, परभणी दोन, हिंगोली दोनला२तूर तीन, उस्मानाबाद तीन, बीड एक व नांदेड जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांचा समावेश आहे.