अमरावती : एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला ‘आता तुझा खेळ खल्लास; आता तू मेलीस!,’ अशी गर्भित धमकी देण्यात आली. धामणगाव रेल्वे येथील एका प्रथितयश शाळेसमोर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३०च्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित विद्यार्थिनी त्या माथेफिरूस ओळखत नसल्याने अज्ञात आरोपींविरुद्ध विनयभंग, धमकी व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी देखील शहरात एका विद्यार्थिनीसोबत असाच अश्लाघ्य प्रकार घडला होता. तक्रारीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३०च्या सुमारास ती अल्पवयीन फिर्यादी मुलगी शाळेला सुट्टी झाल्याने घरी जाण्याकरिता व्हॅनची वाट पाहत शाळेसमोरच उभी होती. त्यावेळी एकापेक्षा अधिक असलेले आरोपींचे टोळके तिच्यावर लक्ष ठेवून होते. दरम्यान, ती शाळेच्या गेटसमोर आली असता, त्यातील एका आरोपीने मुलीच्या अंगावर एक चिठ्ठी फेकली. ती चिठ्ठी वाचून ती नखशिखांत हादरली. मोठे धाडस करून ती घरी परतली. परतल्यानंतर संपूर्ण प्रकार तिने कुटुंबीयांच्या कानावर घातला. आप्तांनी तिला धीर देत सायंकाळच्या सुमारास दत्तापूर पोलिस ठाणे गाठले.
काय होते त्या चिठ्ठीत
‘तुम्हाला खल्लास करतो. उद्यापर्यंत तुमचा परिवार खतम. तू तुझ्या बापाला सांगितले वाटते. आता तो मरते. चाललो आम्ही त्याला पाहायला. याचा विचार करशील. तू मरतेस आता. तू माझा खेळ खतम केलास,’ असा धमकीचा मजकूर त्या चिठ्ठीत होता. दत्तापूर पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली असून, त्या अज्ञात आरोपींचा शोध चालविला आहे.
रिपोर्ट दिला म्हणून विनयभंग
अन्य एका घटनेत ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ब्राम्हणवाडा थडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आपल्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार का दिली, त्याचा जाब विचारत आरोपी अमोल गावंडे (३२, वणी बेलखेडा) याने आपला विनयभंग केल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. आरोपी हा लक्ष ठेवून आपला पाठलाग करत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.