अमरावती : देशात नागरिकांची स्वतंत्र ओळख म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधारकार्डपासून कोणीही वंचित राहता कामा नये, अशी शासन नियमावली आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांचेही आधारकार्ड बनविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी कागदपत्रे नव्हे, तर कारागृहातील अभिलेखाच्या आधारे बंद्यांचे हमीपत्र देण्यात आहे.बंदीजणही आधारकार्डपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कारागृहात २६ नोव्हेंबरपासून कैद्यांची आधार नोंदणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरदिवसाला ३० ते ३५ बंद्यांची आधारकार्डसाठी नोंदणी केली जात आहे. महिला, पुरुष बंद्यांना आधार नोंदणी अनिवार्य केले आहे. अभिलेखागाराच्या आधारे ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. कारागृहात ९९४ कैदी असून आतापर्यत ९० टक्के बंद्यांची आधार नोंदणी झाली आहे. कोणीही बंदी वंचित राहू नये, याकडे कारागृह प्रशासनाचे लक्ष आहे. आधार नोंदणीचा हा तिसरा टप्पा आहे. यासाठी वरिष्ठ तुरुगांधिकारी एच.बी. कुंटे, शिक्षक ए. आर. गव्हाणे कार्यरत आहेत.
- आता कैद्यांनाही स्वतंत्र ओळख
By admin | Published: November 30, 2014 10:56 PM