अमरावती : 'राणा लँडमार्क' प्रकरणातील तपास अधिकारी गणेश अणे यांना हटविण्याच्या मागणीसाठी आता पीडित महिलांनी साखळी उपोषण आरंभले आहे. युवा सेनेच्या राहुल नावंदे या तरुणाची आज आठव्या दिवशी प्रकृती ढासळल्यानंतर युवा सेनेच्या मंडपातच महिलांचे हे उपोषण सुरू झाले. फसवणूक झालेल्या मंडळींचाच तपास अधिकाऱ्यावर विश्वास नसला तरी पोलीस आयुक्त अद्यापही अणे यांची पाठराखण करीत असल्याचे चित्र आहे. राहुल नावंदे याची प्रकृती ढासळल्याची वार्ता पोहोचताच राणा लँडमार्क प्रकरणातील पीडितांनी उत्स्फूर्तपणे उपोषण मंडपात दिवसभर ठिय्या दिला. 'जिल्हाधिकारी किरण गित्ते मुर्दाबाद' अशी फलके घेऊन ही मंडळी मंडपात बसली होती. आता पुढच्या उपोषणाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यानुसार, सोमवारी रेखा गोलाईत आणि माधुरी बोडखे या महिलांनी उपोषण आरंभले. माजी खासदार अनंतराव गुढे यांनीही उपोषण मंडपात उपस्थिती दर्शविली. आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश अणे यांच्यावर फसगत झालेल्या गुंतवणूकदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी अणे यांची अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी गुढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. युवा सेनेचे उपशहरप्रमुख वैभव मोहोकार यांनीही राहुल नावंदे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी युवा सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करीत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भैया बरबट यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला समर्थन जाहीर केले.
- आता 'राणा लँडमार्क' पीडित महिलांचे साखळी उपोषण
By admin | Published: February 02, 2015 10:56 PM