अमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दिव्यांगांना लागणाऱ्या उपकरणासाठी आता वेब पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार २१ प्रकारच्या व्यक्तींना वैद्यकीय चाचणी, उपकरणांसाठी १२ डिसेंबरपासून शरद दिव्यांग अभियानाला प्रारंभ झाले आहे.
दिव्यांगांच्या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींना राज्य शासनाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. हे अभियान एक वर्षासाठी राबविले जाणार आहे. उपकरणाच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्ती ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीचे दिव्यांगाचे ४० टक्के प्रमाणपत्र असावे, बौद्धिक दिव्यांगाच्या लाभार्थ्यांसाठी पालकांना अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांना वेब पोर्टलवर माहिती भरणे आवश्यक आहे. दिव्यांगांना लाभ देताना प्राधान्यक्रम ठरवावे लागणार आहे. दिव्यांग उपकरणाच्या लाभासाठी जास्त प्रणामात नाेंदणी करावी, असे आवाहन समाजकल्याणचे उपायुक्त विजय साळवे यांनी केले आहे.