- गणेश वासनिक
अमरावती : वाहन चोरीच्या घटनांना आळा बसविणे, भरधाव वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, फॅन्सी नंबर प्लेट्सला लगाम लावणे आदी गैरकायदेशीर बाबींवर अंकुश लावण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने देशभरातील सर्व प्रकारच्या वाहनांवर लेझर कोटेडयुक्त सुरक्षित नंबर प्लेटस् लावण्याचे धोरण आहे. त्याकरिता शासनस्तरावर एजन्सी नेमली जाणार असून, येत्या काही दिवसांत वाहनांवर एकाच प्रकारची नंबर प्लेटस् असणार आहे.केंद्र सरकारने वाहतूक नियमावलीत सुसूत्रता, पारदर्शकता आणली असून नागरिकांची कामे वेळेत व्हावी, यासाठी सर्वच राज्यांच्या प्रादेशिक परिवहन विभागाची एकूणच कामे आॅनलाईन करण्यासाठी कास धरली आहे. वाहनांचे स्मार्ट कार्ड हादेखील त्याचाच भाग ठरला आहे. मात्र, वाहनांच्या नंबर प्लेट्स कशा प्रकाराचे असावे यासंदर्भात यापूर्वी कोणतेही निकष किंवा नियमावली नव्हती. त्यामुळे वाहनधारकांना मनात येईल तशा नंबर प्लेटस् तयार करून वाहनांवर लावल्या आहेत. दादा, मामा, भाऊ, अण्णा, मराठा, महाराष्ट्र, तर कुणाचे आडनाव, जन्मतारीख, नावे अंकित केलेल्या नंबरप्लेट्स वाहनांवर लावण्यात आल्याचे वास्तव आहे. बरेचदा चोरटे वाहनांची चोरी करून बनावट नंबरप्लेट्स लावून ते एका राज्यातून दुस-या राज्यात बिनदिक्कतपणे वाहतूक करीत होते. ही बाब पोलिसांनी कालांतराने तपासून निष्पन्न केली. नंबरप्लेट्समध्ये समानता नसल्याने चोरीची वाहने ओळखणे पोलीस, आरटीओंसह अन्य यंत्रणांनादेखील कठीण जाते. परंतु, आता केंद्र सरकारने वाहनांवर एकाच प्रकारचे नंबरप्लेट्स लावण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतल्यामुळे ती अतिसुरक्षित असणार आहे. अॅल्युमिनियमने निर्मित लेझर कोटेडयुक्त ही नंबरप्लेट्स असल्यामुळे डिजिटल क्रमांक आणि आकड्यांमध्ये समानता असणार आहे. त्यामुळे ही नंबरप्लेट्स शासन मान्यता असल्याचे स्पष्ट होणार आहे.
काय असेल नव्या नंबरप्लेट्समध्येकेंद्र सरकारने दुचाकी ते चार चाकीसह अन्य वाहनांकरिता आता एकाच स्वरूपाची नंबर प्लेट्स लावण्याचे धोरण आहे. अॅल्युमिनियम कॉईलद्वारे निर्मिती ही प्लेट असेल. सातअंकी अक्षरात वाहनांचे क्रमांक, लेझर कोटींग प्रणालीचा वापर, सिरीयल वाहन क्रमांक, अॅम्बॉस प्रणालीतून आयएनडी, युनिफॉर्मिलीटीला प्राधान्य तर पोलीस तपासात वाहनांची चोरी कुठे, कशी झाली, हे क्षणात कळेल.
अॅल्युमिनियमद्वारे निर्मित लेझर कोेटेडयुक्त नंबर प्लेट्स वाहनांवर लावले जाणार आहे. एकदा ही नंबर प्लेट्स लावली की ती पुन्हा काढता येणार नाही. ती तुटेल. पण, वाहनातून निघणार नाही. एकाच प्रकारचे सुरक्षित नंबर प्लेट्स असल्याने वाहतूक नियमावलीचे नियंत्रण असेल.- संदेश चव्हाण,उपायुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग महाराष्ट्र