आढावा बैठक : गृहराज्यमंत्र्यांची माहिती, इफेक्टीव्ह पोलिसिंगवर भर, गुन्हेगारी रोखण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशनअमरावती : शहरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ‘इफेक्टीव्ह पोलिसिंग’चे निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: जे पोलीस दप्तरी संवेदनशील ठाणे आहेत, अशा भागात विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठांवर सोपविली जाईल, अशी माहिती राज्याचे गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे मंगळवारी दिली. ना.पाटील हे अमरावतीत आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली. ना.पाटील यांच्या मते अंबानगरी ही सांस्कृतिक, शैक्षणिक क्रीडानगरी म्हणून नावारुपास येत असताना गोळीबार, टोळीयुद्ध होणे ही बाब या शहरासाठी दु:खद आहे. सोमवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात ११ आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. या घटनेतील फिर्यादी नागपुरात उपचार घेत आहेत. मात्र गोळीबार प्रकरणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात देशी कट्टे मोठ्या प्रमाणावर येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना नामदार पाटील यांनी पोलिसांना यासंदर्भात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. ज्यांच्याकडे देशी कट्टे आढळले, हे देशी कट्टे कोठून आले, याच्या खोलात पोलिसांनी शिरुन याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला शोधून काढण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर सोपविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संवेदनशील पोलीस ठाणे परिसरात गुन्हेगार, तडीपार यांना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे पोलीस ठाणे संवेदनशील आहेत, त्या भागात मॉनेटरिंग प्रणाली लागू करुन अधिकारी, कर्मचारी असा समन्वय ठेवला जाणार आहे. जेणेकरुन गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासह अवैध धंद्यांवर पुर्णपणे लगाम लावता येईल, असे ते म्हणाले. दोनवेळा झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्ट होत असले तरी पोलिसांना यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. पोलीस सूचनांचे पालन करीत आहेत. मात्र गुन्हेगारीबाबत निकालासाठी काही कालावधी द्यावा लागेल, असे नामदार पाटील यांनी म्हणाले. यापुढे संवेदनशील ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांच्या कर्तव्याचा रेकॉर्ड तपासला जाईल. अशा ठाण्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी आणि कर्तव्यदक्ष पोलिसांची नियुक्ती करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांना दिले जाणार आहे. पोलिसांच्या वेतनाचा प्रश्न, वसाहती, वेतन श्रेणी, प्रवास भत्ता अशा अनेक समस्या आहेत. मात्र या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सीमेवरील नाक्यांवर सुक्ष्म तपासणीपरप्रांतातून महाराष्ट्रात येणारे देशी कट्टे, पिस्तुल, तस्करी आदी बाबी रोखण्यासाठी राज्याच्या सिमेवरील नाक्यांवर पोलिसांकडून सुक्ष्म तपासणी केली जाणार आहे. काही महत्वाच्या नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे धोरण गृहविभागाचे आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गृहविभाग आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. विशेषत: मध्य प्रदेशातून महाराष्ट्राला जोडणाऱ्या सिमा नाक्यांवर पोलिसांना सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता संवेदनशील पोलीस ठाणे लक्ष्य
By admin | Published: January 13, 2015 10:51 PM