गणेश वासनिक
अमरावती : दरवर्षी उन्हाळा प्रारंभ झाला की,जंगलात वन वणवा पेटून लाखो हेक्टर जंगल जळून खाक होते. हजारो वन्यजीव होरपळून मृत्यूमुखी पडतात. आग विझविताना कर्मचाऱ्यांना प्रसंगी गतप्राण व्हावे लागते. मात्र,आता वन विभागाने वन वणवा नियंत्रणासाठी ‘फायर बाॅल’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बॉलद्धारे काही वेळातच जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविले जाणार आहे.
वनात लागणारी आग वन्यजीवांना कर्दनकाळ ठरते. आग नियंत्रण करून वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी वनकर्मचारी त्यांचे जीव धोक्यात घालून अफाट वनक्षेत्रातील आग नियंत्रणात आणतात,पारंपरिक पद्धतीने झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून वनकर्मचारी वनातील आग विझविण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही पद्धत वनकर्मऱ्यांच्या जीवावर बेतणारी व वेळ घेणारी ठरली. त्यामुळे नव्या संशोधनाच्या आधारे वनविभागात ’फायब्लोअर’चा वापर आग विझविण्यासाठी केला जातो,मात्र,अपुऱ्या निधीमुळे फायर ब्लोअर मोठ्या प्रमाणात खरेदी करणे वनविभागाला शक्य नाही. मात्र ‘फायब्लोअर’ सोबतच आता वनविभागाने आग विझविण्यासाठी ‘फायर बाॅल’ची कास धरली आहे.
फायर बाॅल म्हणजे काय?
फायर बाॅल हे वनातील आग विझविण्याचे अत्यंत सुरक्षित व सुलभ उपकरण वनविभागाने आत्मसात केले आहे. यावर्षी राज्यात प्रत्येक विभागाने फायर बाॅलची मागणी केली आहे. हे एचडीपीईपासून तयार झालेले आहे. वनातील आगीत हे टाकले की, त्याचा स्फोट होतो आणि त्यातून निघणारे पावडर हवेतून आगीवर मारा करते व आग त्वरित नियंत्रणात येते. या बॉलमध्ये २ किलो ग्रॅमचे पावडर भरलेले असते.
फायर बाॅलमध्ये हे आहेत घटक
फायर बाॅलमध्ये आग रोखण्याचे सिंथेटिक कटेंनर,बायोडिग्रेडेबल,सेफ फ्ल्यूड युल्ल्ड, ओझोन फेंडली,अलार्म यंत्रणा, सायन्टिफिक प्रोसेस,एक्ट्रा क्विक या घटकांंचा समावेश आहे. वनात आग लावल्यावर आगीच्या क्षेत्रात हा फायर बाॅल टाकला की,त्याचा स्फोट होईल व त्यातील घटक रुपी पावडर आगीवर पडून आग शांत करेल,याचा उपयोग करण्यासाठी वनविभागाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार नाही.
फायर बाॅल वन वणवा रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. ते हाताळण्यासाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)