गणेश वासनिक
अमरावती : अभियांत्रिकीच्या परीक्षांमध्ये पारदर्शता आणि सुसूत्रता आणण्यासाठी आता प्रश्नपत्रिका सॉफ्टवेअरने तयार केली जाणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२२पासून सॉफ्टवेअरद्वारे प्रश्नपत्रिका हा पहिला पायलट प्रयोग राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार पेपरलेसच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
अमरावती विद्यापीठात २२ जुलै रोजी परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. यात परीक्षा, मूल्यांकन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तथापि, दोन वर्षांपूर्वी वाशिम येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. अशा घटना होऊ नयेत आणि परीक्षा प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी अभियांत्रिकी शाखांच्या प्रश्नपत्रिका सॉफ्टवेअरद्वारे तयार केल्या जाणार आहेत. हिवाळी २०२२पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी हा पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न टप्प्याटप्याने पुढे नेत अंतिम वर्षापर्यंत लागू होईल, अशी तयारी अमरावती विद्यापीठाने केली आहे. मनुष्यबळाचा अल्प वापर अशी नव्या प्रणालीची संकल्पना आहे.
एका विषयासाठी असतील सहाशे प्रश्न
अभियांत्रिकीच्या शाखानिहाय प्रश्नपत्रिका पेपरसेटरकडून तयार करून घेण्यात येणार आहेत. एका विषयाच्या पेपरसाठी किमान सहाशे प्रश्नपत्रिका तयार केल्या जातील. हे प्रश्न सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यात येतील. त्यानंतर सॉफ्टवेअर विषयाच्या पेपरनुसार प्रश्नपत्रिका तयार करेल. यावर्षी प्रथम वर्षासाठी ही प्रणाली असणार आहे.
२५ महाविद्यालयांसाठी नियमावली लागू
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या २५ अभियांत्रिकी महाविद्यालयांत परीक्षांमध्ये सॉफ्टवेअरद्वारे तयार प्रश्नपत्रिका असणार आहे. यंदा अभियांत्रिकीच्या नऊ शाखांचे पेपर सॉफ्टवेअरने तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार पेपरसेटरकडून प्रश्न बॅंक विकसित केली जाईल.
परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार, अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी सॉफ्टवेअरद्वारे प्रश्नपत्रिकांची अंमलबजावणी हिवाळी २०२२ परीक्षेपासून लागू होणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षा विभागाने सॉफ्टवेअर विकसित करण्याची तयारी चालविली आहे.
- डॉ. हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ