अमरावती : पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत ९८ सदस्य निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे. बुधवारी राज्य मत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसंख्येच्या आधारावर नगरसेवक सदस्य संख्या वाढीबाबत निर्णय झाला असून, आता ८७ ऐवजी ९८ नगरसेवक अमरावती महापालिका सभागृहात थेट निवडून जातील, असे नवे सूत्र ठरणार आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रात सन २०११ च्या आकडेवारीनुसार ६ लाख ४७ हजार ७५ लोकसंख्या गृहीत धरावी लागणार आहे. मात्र, लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी नगरसेवक संख्येत वाढ करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सध्या अमरावती महापालिकेत ८७ सदस्य संख्या आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी ठरत आहे. सहा लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व कमाल संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल, असे नवे निकष असणार आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत ९८ सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती आहे. नव्या निर्णयानुसार सभागृहात पाच सदस्य स्वीकृत म्हणून निवडले जातील.
कायद्यात दुरुस्तीनंतरच नव्याने रचना
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महापालिका प्रभागरचना कलम ५ मध्ये सुधारणा झाल्यानंतर अमरावती महापालिका प्रशासन नव्याने प्रभागरचना करेल. यापूर्वी प्रभागरचना पूर्ण झाली आहे. मात्र, आता लोकसंख्या विचारात घेऊन ही प्रक्रिया करावी लागणार आहे. ९८ सदस्य संख्या लक्षात घेऊन प्रभागरचना केली जाईल, असे निवडणूक विभागाचे सहायक निर्णय अधिकारी अक्षय निलंगे यांनी सांगितले.
एका प्रभागात १७ ते २१ हजारांवर असेल लोकसंख्या
अमरावती महापालिका निवडणूक ९८ सदस्यांसाठी होणार आहे. तीनसदस्यीय प्रभागप्रणालीनुसार एकूण ३३ प्रभागांत निवडणूक घेण्यात येणार आहे. यात ३२ प्रभागांत तीन सदस्य, तर एका प्रभागात दोन सदस्य निवडून जातील. ३३ प्रभागांत ९८ नगरसेवक, अशी नवीन रचना असणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी अध्यादेशानंतरच प्रभागरचना होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीची पुढील कार्यवाही केली जाईल. तूर्त ‘वेट अँड वॉच’ सुरू आहे.
-प्रशांत राेडे, आयुक्त, महापालिका