अमरावती : महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी टोकन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना तातडीने दाखले मिळण्यास मदत होईल,अशी माहिती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली. २४ एप्रिल रोजी पवार यांनी महानगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागाला भेट दिली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा आत्राम, डॉ. संदीप पाटबागे, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार उपस्थित होते.
नागरिकांच्या सोयी-सुविधेकरीता जन्म-मृत्यू विभागाचे नियोजन करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. नागरिकांची वाढती गर्दी व शहरात तापमान वाढत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून याचेही नियोजन करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. त्यामुळे महापालिका आवारातील वाहन पार्किंग लगतच्या भागात ग्रीन नेट लावून नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. लगेच तेथे ग्रिन नेट लावण्यात आली. महापालिकेत येणाऱ्या नागरिकांचे वाहन दुस-या ठिकाणी लावण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी सुरक्षा रक्षकांना दिले.