मोबाईलवर पाठविण्याचा निर्णय, सेवानिवृत्तांमध्ये नाराजी, पासच्या मुदतीबाबत प्रश्नचिन्ह
अमरावती : रेल्वे बोर्डाकडून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना वर्षातून दोनदा चार महिन्यांच्या कालावधीच्या प्रवासासाठी पेपर पास दिला जातो. मात्र, १ जुलैपासून सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवास पास हा ऑनलाईन देण्यात येणार आहे. तथापि, जून महिना संपण्यापूर्वीच ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पेपर पास दिला जात असल्याने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यत अर्ज केल्यानंतर दरवर्षी दोनदा चार महिन्यांच्या कालावधीसाठी प्रवास पेपर पास मिळत होता. मात्र, आता हा पास मोबाईलवर ऑनलाईन मिळणार आहे.
एकदा प्रवास केला की मुदत संपली असे या प्रवास पेपर पासचे वैशिष्ट्य आहे. रेल्वे बोर्डाच्या नव्या धोरणानुसार ऑनलाईन प्रवास पास ही वर्षातून दोनदा मिळेल, पण त्याचा कालावधी हा प्रवासापुरताच असणार आहे.
त्यामुळे सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रवासावरही मर्यादा आल्या आहेत.
--------------------
रेल्वे बोर्डाच्या आदेशाची पायमल्ली
सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांना पेपर प्रवास पास संदर्भात नव्या आदेशाची अंमलबजावणी होण्यापूर्वी ३० जून २०२१ पर्यंत ऑफलाईन पास देण्यात यावा, असे आदेश रेल्वे बोर्डाचे उप संचालक (वित्त विभाग, एचआरएमएस) जया कुमार जी यांनी १५ मे २०२१ रोजी स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने सर्वच विभागांना पत्र पाठविले आहे. असे असताना भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना ऑफलाईन पास न देता ऑनलाईन देण्याचा प्रताप चालविला आहे.
-----------------------------
कोट
सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या वरिष्ठांना कळविण्यात आल्या आहेत. यात काही जणांकडे ॲंण्ड्राॅईड मोबाईल नसल्याने अडचणी येत असल्या तरी प्रवास पास या समस्येतून मार्ग काढला जाईल. गाईडलाईन मागविले आहे.
- एस. एन. माळोदे, लोको फोरमन, बडनेरा रेल्वे
----------
कोट
रेल्वे बोर्डाने १ जुलैपासून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा प्रवास पास ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, भुसावळ मध्य रेल्वे विभागाने जून महिन्यात प्रवास पास ऑनलाईन देण्याची प्रक्रिया आरंभली आहे. ही बाब सेवानिवृत्तांवर अन्याय करणारी आहे.
- नंदराज मघाळे, संयोजक, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटना.