अमरावती : बाजार समितीच्या निवडणूक आटोपत नाही तोच इच्छूकांना सभापती व उपसभापती पदाचे वेध लागले आहे. यासाठी नेत्यांकडे लॉबिंग सुरु झालेली आहे. सहकार विभागाद्वारा दोन दिवसात अधिसूचना काढण्यात येणार आहे व त्याचे सात दिवसानंतर संबंधित सचिवांद्वारा विशेष सभेची नोटीस काढण्यात येणार आहे. त्यामुळे १२ ते १४ मे दरम्यान सभापती व उपसभापतींच्या निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यात अमरावती-भातकुली, तिवसा, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या बाजार समितींच्या पंचवार्षिक निवडणूक २८ व ३० एप्रिल रोजी आटोपल्या आहेत. आता जिल्हा उपनिबंधक तथा बाजार समित्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेद्वारा संबंधित उमेदवार विजयी झाल्याबाबत दोन दिवसात नोटीफिकेशन काढण्यात येणार आहे.
यानंतर संबधित बाजार समित्यांचे सचिवाद्वारा सात दिवसाच्या कालावधीनंतर विशेष सभेसाठी नोटीस काढण्यात येणार आहे. त्यामुळे १२ ते १४ मे च्या दरम्यान सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे व या सभेचे पीठासीन अध्यक्ष हे संबंधित निवडणूक अधिकारी राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक भालचंद्र पारिसे यांनी दिली.