अमरावती : हनुमान चालिसा पठण केले म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात खासदार-आमदार राणा दाम्पत्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट १२ दिवस जेलमध्ये पाठविण्यात आले. पण लक्षात ठेवा आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे काढले.
अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. चंद्रयान-३ हे दक्षिण ध्रुवावर उतरविणारा भारत देश पहिला ठरला आहे. त्यामुळे आता इंडिया नव्हे तर भारत मातेचा नारा गुंजणार आहे. भारत हा प्रभू श्रीराम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. तामिळनाडू राज्य सरकारातील प्रबळ मंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हा कोविड, मलेरियासारखा असून, तो संपणार असे व्यक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, हिंदू धर्म कधीही संपणार नाही. यापूर्वीदेखील अनेकदा आक्रमण झालेत. पण स्टॅलिनसारखे हजारो आले तरी हिंदू धर्म कोणीही नष्ट करू शकत नाही. या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, म्हणूनच विश्वात भारताचा तिरंगा डौलाने फडकत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता राजपाल यादव, भाजपचे नेते किरण पातुरकर, ॲड. प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर यासह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होेते.