अमरावती :रेल्वे विभागाने उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना चालविल्या आहेत. मात्र, आता लग्न, शुभकार्य अथवा पर्यटनाला जायचे असल्यास एक बोगी अथवा अख्खी रेल्वे गाडी बुक करता येणार आहे. विशेषत: लग्नासाठी रेल्वे बुकिंगची सोय केली आहे. इंडियन रेल्वे टुरिझम कार्पोरेशन या संकेतस्थळावर जाऊन रेल्वे गाडी बुक करण्याची सुविधा आहे.
बोगी किंवा अख्खी रेल्वे गाडी बुक करण्यासाठी सन २०१७ पर्यंत रेल्वे विभागाकडे जबाबदारी होती. मात्र, आता आयआरसीटीसीने कोणाला रेल्वे गाडी किंवा एक बोगी बुक करायचे असल्यास ती व्यवस्था केली आहे. संकेतस्थळावर नेमके कोणत्या मार्गावर ये-जा करायचे आहे, याचे मॅप दिले आहे. आसन क्षमतेनुसार प्रवास शुल्क, अनामत रक्कम, रद्द केल्यानंतरची नियमावली उपलब्ध आहे. त्यामुळे आता रेल्वेने लग्नाचे वऱ्हाड ने-आण करणे सोयीचे झाले आहे.
एका बोगीसाठी १.२० लाख
अमरावती - मुंबई असे लग्नाचे वऱ्हाड घेऊन ज्यायचे असल्यास ७२ सीटच्या एका बोगीसाठी १.२० लाखांचे भाडे आकारले जाणार आहे. बोगीसाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे. यात ये-जा करण्याचे शुल्क, सर्विस चार्ज, १२ तासांचे हॉल्ट शुल्कदेखील आकारले जाते.
अख्खी रेल्वे २१ लाखांत
अमरावती- मुंबई या दरम्यान १८ डब्यांची बोगी बूक केल्यास २१ लाख ६० हजार रुपये लागतात. यात अतिरिक्त दोन बोगी एसएलआरचे जोडण्यात येते. ७ बोगींचे बुकिंग असेल तरच अख्खी रेल्वे बुक करण्याची सुविधा आयआरसीटीसीने केली आहे.
एका बोगीसाठी ५० हजारांचे अनामत
आयआरसीटीसी संकेतस्थळावर कोणत्याही मार्गावर रेल्वे बोगी बुकींगसाठी किमान ५० हजारांची अनामत रक्कम लागते. त्याशिवाय बुक होत नाही. अनामत रक्कम जमा करण्याची सुविधा ऑनलाईन आहे.
रेल्वेने वऱ्हाड, असे करा बुक
लग्नाचे वऱ्हाड रेल्वेने न्यायचे असल्यास आयआरसीटीसी संकेतस्थळावर बोगी बुक करता येते. त्याकरिता एफटीआर.आयआरसीटीसी. सीओ.ईन या संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. प्रवासाच्या किमान ३० दिवसांनंतर आणि सहा महिन्यांपूर्वी बोगी बुक करता येते.
बोगी बुकींगसाठी ये-जा करण्याचे प्रवास भाडे आकारले जाते. ही सुविधा आयआरसीटीसीने ऑनलाईन सुरू केली आहे. अनामत रक्कम, बोगीचे १२ तासांचे हॉल्ट शुल्क आदींचा समावेश असतो.
- महेंद्र लोहकरे, प्रबंधक अमरावती रेल्वे स्थानक