लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने मंगळवारपासून ‘कास्ट व्हॅलिडिटी’ ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या नियंत्रणात ही प्रणाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे येण्याची गरज नाही.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने काही महिन्यांपूर्वी ‘कास्ट व्हॅलिडिटी’ प्रक्रिया ऑनलाईन करण्याची घोषणा केली होती. ना. धनंजय मुंडे यांनी चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची एकूणच प्रक्रिया ऑनलाईन करण्याविषयी वारंवार बैठकी घेतल्या. परिणामी लॉकडाऊन शिथिल होताच जातवैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी अमरावती येथे एक अर्ज ऑनलाईन भरण्यात आला. यामुळे आता जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात कामकाजासाठी फेऱ्या घालण्याची भानगड संपली आहे. एससी, ओबीसी, मराठा, व्हीजेएनटी, एसबीसी संवार्गातील उमेदवारांना ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.असा करावा लागेल अर्जबार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर ‘कास्ट व्हॅलिडिटी’ ही पीडीएफ ई-मेलद्वारे प्राप्त होईल. शुल्कदेखील ऑनलईन भरावे लागेल. कागदपत्रे पडताळणीसाठीची गरज असणार नाही. उमेदवारांना प्रकरण कोणत्या स्तरावर आहे, हे ऑनलाईन बघता येणार आहे. रक्तसंबंधाचा जाहीरनामासुद्धा ऑनलाईन सादर करावा लागणार आहे.
ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ववत होईल. पीडीएफ स्वरूपात ई-मेलवर ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळेल. तूर्तास ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर शुल्क भरण्यासाठी कार्यालयात यावे लागेल. कालातंराने तेही बंद होणार आहे.- सुनील वारे, उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती, अमरावती.