धारणी : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात खासगी शाळांत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होत असल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धात्मक आव्हानाला सामोरे जाताना आता जिल्हा परिषदेच्या शाळेतही ई-लर्निंग सुरु करण्याचा मान अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मिळविला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद शाळांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसह भौतिक सुविधांच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून तर शिक्षकांना अशैक्षणिक कामापर्यंत अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोठा अडसर निर्माण होतो. परिणामी गुणवत्तापूर्ण अध्ययन, अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहतात. त्या तुलनेत खासगी शाळांत अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आमुलाग्र बदल होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शिक्षणक्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढण्याकरिता विविध उपक्रम, शैक्षणिक दर्जा वाढविला जातो.भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मुंबईच्या इम्पथी फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रोजेक्टर, कॉम्प्युटर संच व इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर दिले आहेत. यासाठी प्रत्येकी ऐंशी हजार रुपये खर्च झाला आहे. या डिजिटल आधुनिक शैक्षणिक साधनाने विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापन मोठे रंजक होणार आहे.
आता जिल्हा परिषदेच्या शाळांतही ‘ई-लर्निंग’
By admin | Published: January 10, 2015 12:15 AM