संदीप मानकरअमरावती : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कुठलेही शासकीय काम करायचे असेल तर लाच घेतल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला आळा घालण्यासाठी एसीबी विभागदेखील सक्रिय असून ट्रॅपसुद्धा वाढले असून, १ जानेवारी ते ४ जुलै या सहा महिन्यांमध्ये ४४४ ट्रॅप म्हणजेच दरदिवसाला राज्यात दोन ते तीन जण एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत.सहा महिन्यांमध्ये राज्यात आठही विभागांत ४४४ ट्रॅप एसीबीने यशस्वी केले. म्हणजे प्रत्येक महिन्याला ७४ ट्रॅप राज्यात झाले आहे. दर दिवसाला २ ते तीन ट्रॅप यशस्वी होत आहेत. त्याकारणाने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. यात याहीवर्षी लाच खाण्यात महसूल विभाग अव्वल स्थानी असून, सर्वाधिक १०१ ट्रॅप याच विभागातील आहेत. दुसरा क्रमांक हा पोलीस विभागाचा लागतो. या विभागात ९१ सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी केले, तर पंचायत समितीमध्ये ५०, वीज कंपनी ३०, महापालिका २७, शिक्षण विभाग १६, वनविभाग १४, सहकार व पणण विभाग १३, जिल्हा परिषद १५, आरोग्य विभाग १०, कृषी विभाग ९, जलसंपदा विभाग १०, विक्रीकर विभाग ६, सार्वजनिक बांधकाम विभाग ३, आदिवासी विकास ३ व इतर अनेक विभागांचा यामध्ये समावेश आहे.तृतीय श्रेणीचे सर्वाधिकसहा महिन्यांत रचलेल्या सापळ्यांमध्ये वर्ग १ चे ४४, वर्ग २ चे ५३ अधिकारी व व वर्ग तीनचे ३६३ अधिकारी कर्मचारी अडकले आहेत. वर्ग ४ चे सर्वात कमी २३ कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत.पुणे विभाग पहिल्या क्रमांकावरएसीबीने केलेल्या लाचखोरीच्या कारवाईत सर्वाधिक ९७ ट्रॅप पुणे विभागात यशस्वी झाल्याने पहिला क्रमांक पुणे विभागाचा लागतो. मुंबई विभाग २१, ठाणे ५३, नाशिक ४३, नागपूर ६७, अमरावती ६१, औरंगाबाद ५५, व नांदेड विभागात ४७ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. या व्यतिरिक्त १३ अपसंपदाच्या प्रकरणाचाही यामध्ये समावेश आहे.
राज्यात दरदिवसाला एसीबीचे दोन सापळे, लाचखोरांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 4:30 PM