अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे ३२५ दिवसांत एकूण १,९९,१२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली व या आठ दिवसांत ११,३०१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल २,७५२ नमुने पॉझिटिव्ह असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
कोरोनाचे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी त्यापूर्वी जिल्ह्यातील चाचण्यांची रोजची संख्या ५०० ते ७०० चे दरम्यान होती. या आठवड्यात मात्र हजार ते दोन हजारांदरम्यान चाचण्या होत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे, या आठवड्यात चाचण्यांमध्ये २४.३५ अशी टक्केवारी राहीली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने ७० टक्के आरटी-पीसीआरद्वारे व ३० टक्के रॅपिड अॅन्टिजेनच्या चाचण्या करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार आता आरटी-पीसीआरची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात विद्यापीठाचे लॅबमध्येच फक्त आरटी-पीसीआरद्वारे नमुन्यांची तपासणी होत आहे. त्यामुळे तेथील तंत्रज्ञावरही ताण येत आहे.
अलीकडे नागरिकांची बेफिकिरीदेखील वाढलेली असल्याने कोरोनाचा संसर्गात वाढ झालेली आहे. मास्क बंधनकारक असतानाही व पथकांद्वारे कारवाया होत असतानाही बहुतांश नागरिकांच्या हनुुवटीवर मास्क आहे. लग्नकार्यामध्ये रोज शेकडोंची गर्दी उसळत आहे. काही कार्यालये, लॉनवर पथकांद्वारे कारवाई करण्यात आली असली तरी गर्दीवर याचा परिणाम झालेला नाही. दुकाने, मॉलमध्ये तोबा गर्दी आहे. परिणामस्वरूप कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.
बॉक्स
कोरोनाचे नव्या स्ट्रेनची शक्यता नाही
जिल्ह्यात संसर्ग अचानक वाढला असल्याने कोरोनाचा नवा स्ट्रेन तर नव्हे, अशी भीती निर्माण झाल्याने आरोग्य विभागाने पाच नमुने जिनोम स्टडीकरिता पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला पाठविले. या नमुन्यांचा अहवाल अप्राप्त असला तरी जिल्ह्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन नसल्याची माहिती लॅबने दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.
बॉक्स
अद्याप ३४० नमुने तपासणी प्रलंबित
२४ तासांत १७१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असली तरी अद्याप ३४० नमुने तपासणी प्रलंबित आहेत. आतापर्यंत १,९९,१२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मंगळवारपर्यंत २६,२२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,७० ५९४ नमुने निगेटिव्ह आले. यापैकी २४,२७० रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा अहवाल आहे.
बॉक्स
या आठवड्यातील चाचण्यांची स्थिती
दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह टक्केवारी
१६ फेब्रुवारी१७१० ४८५ २८.३६
१५ फेब्रुवारी२४०६ ४४९ १८.६६
१४ फेब्रुवारी२२६५ ३९९ १७.६१
१३ फेब्रुवारी११३४ ३७६ ३३.१५
१२ फेब्रुवारी११४२ ३६९ ३२.११
११ फेब्रुवारी१२५१ ३१५ २५.१७
१० फेब्रुवारी१३९३ ३५९ २५.५५