मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी लागू केलेल्या आदर्श आचारसंहिता कालावधीत प्रशासनाने मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. यामध्ये विशेषतः स्थिर निगराणी करणारी पथके तयार केली आहेत. ही पथके शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करतात, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पैशांचा वापर आणि अशा प्रकारची अनियमितता रोखता येईल. शहराच्या विविध प्रवेश मार्गांवर नाकेबंदी लावून, वाहने थांबवून त्यांची 'इन कॅमेरा' तपासणी केली जात आहे. या सर्व उपाययोजनांमुळे प्रशासनाची करडी नजर आहे, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी शहरात काही विनानंबरची वाहने फिरताना आढळून येत आहेत. ही वाहने अनेकदा 'व्हीआयपी' स्टिकर व काही चिन्हांचा वापर करून येत आहेत.
ज्यामुळे या वाहने त्याच तपासणीमधून सुटून जात आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी का केली जात नाही आणि प्रशासन यावर योग्य प्रतिसाद का देत नाही? असादेखील प्रश्न या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे.
व्हीआयपी स्टीकर लावून वाहने सुसाट जिल्ह्याच्या प्रमुख मार्गावर २४ ठिकाणी स्थिर निगराणी पथके, ६० फ्लाइंग स्कॉड, ३४ व्हिडीओ सर्वेक्षण टीम आहेत. शिवाय, इतर पथके सुद्धा प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत. निवडणूक प्रक्रियेत पैशांचा गैरवापर होणार नाही, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत.
शहराच्या प्रमुख मार्गावर स्थिर निगराणी पथके शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गावर स्थिर निगराणी पथकांची नजर आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. याठिकाणी इन कॅमेरा तपासणी होत असून, सीसीटीव्हीचीदेखील नजर आहे. तरी सुद्धा शहरात विनानंबरची व्हीआयपी स्टीकर लावून वाहने फिरत आहेत. शहरात या वाहनांनी स्थिर निगरानी पथकांची नजर चुकवून शहरात प्रवेश केला कसा? असा प्रश्न आहे.
"राज्य परिवहन विभागाच्या वतीने स्कॉड निर्माण केले आहे. विनानंबरची वाहने दिसत असेल तर त्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाही करण्यात येते."- उर्मिला पवार, आरटीओ