अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मंगळवारी घेण्यात आलेल्या विविध प्राधिकारणीच्या निवडणुकीत नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन (नुटा) संघटनेचे वर्चस्व राहिले. व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, स्थायी समिती, तक्रार निवारण समिती, विद्यार्थी विकास निधी समिती, शिक्षण कल्याण निधी समिती ‘नुटा’ एकहाती सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरली. शिक्षण मंच, अभाविपला पराभवाचा सामना करावा लागला, हे विशेष.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यापीठात आयोजित अधिसभेच्या वार्षिक सभेत निवडणुकीत ६९ जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
यात नुटा संघटनेचे व्यवस्थापन परिषदेवर हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य विजय नागरे, प्रा. हरिदास धुर्वे तर भैय्यासाहेब मेटकर, तर डॉ. रवींद्र मुंद्रे हे अध्यापक वर्गवारीत अनुसूचित जाती संवर्गातून तक्रार निवारण समितीत अविरोध निवडून आले. सिनेट टू व्यवस्थापन परिषदेत डॉ. प्रवीण रघुवंशी यांना ४२ मते, अविनाश बोर्डे यांना ४३, प्राचार्य आर. डी. सिकची यांनी ३९ मते प्राप्त करून नुटाचा झेंडा रोवला. तसेच तक्रार निवारण समितीवर शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतून डॉ. जयंत वडतकर हे अविरोध निवडून आले आहे.
विद्या परिषदेवर व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. अशोक चव्हाण यांना ५६, प्राचार्य प्रतिनिधी डॉ. सुभाष गावंडे यांना ३८, पदवीधर प्रतिनिधी डॉ. नितीन टाले यांनी ३५ मते प्राप्त केली आहे. तर शिक्षण कल्याण समितीवर प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी ३४ मते मिळवून नुटा, प्राचार्य फोरमच्या हाती सत्ता मिळवली आहे. विद्या परिषद निवडणुकीत डॉ. अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रा. मीनल गावंडे यांनी माघार घेतल्याने चव्हाण यांचा विजय सुकर झाला, हे विशेष. अधिसभा पीठासिनावर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख हे उपस्थित होते.ईश्वरचिठ्ठीतही ‘नुटा’चे विजय कापसे विजयी
विद्यार्थी कल्याण विकास निधी समितीवर नुटाचे डॉ. विजय कापसे आणि शिक्षण मंचचे प्रशांत विघे यांना दोघांनाही समान ३८ मते मिळाली होती. त्यामुळे विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शंकर नामक शिपायाने ईश्वरचिठ्ठी काढली असता ‘नुटा’चे विजय कापसे विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कुलसचिवांनी विजय कापसे यांच्या विजयाची घोषणा केली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीही ‘नुटा’च्या बाजूने असल्याची चर्चा रंगली.