अमरावती : विभागीय सहनिबंधक कार्यालयाने २० जुलै रोजी जिल्हा मध्यवती बँकेची मतदार यादी प्रसिध्द केली. यात विविध सेवा सहकारी संस्था, इतर नागरी संस्था व वैयक्तिक मतदार असे १ हजार ६०८ मतदारांच्या नावांसह ६२ मयत मतदारांचा समावेश केला आहे. या यादीवर १६० जणांनी आक्षेप नोंदविला असून, यावर ९ ऑगस्टपर्यंत अंतिम निर्णय दिला जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला हाेता. याअंतर्गत जिल्हा बँकेकडून प्राप्त झालेली प्रारूप मतदार यादी सहकार विभागाने २० जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. बँकेच्या आवारात मतदारांसाठी ही यादी अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदार यादी कार्यक्रम २४ जून ते ८ जुलै दरम्यान सहकारी संस्थेतील सभासदांचे ठराव करून ते उपनिबंधक कार्यालयात पाठवायचे होते. यामध्ये १२४२ संस्थांचे ठराव उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले होते. त्याची पडताळणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने करून ती प्रारूप मतदार यादी १६ जुलै रोजी निवडणूक सहकार अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. या पडताळणीत काहींचे ठराव बाद करीत तसेच वैयक्तिक मतदान असे एकूण १,६०८ मतदारांची यादी २० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यात ६२ मयत मतदारांचादेखील समावेश करण्यात आला होता. यावर ३० जुलैपर्यंत १६० जणांनी मतदार यादीवर हरकती विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे नोंदविल्या आहेत. ९ऑगस्टपर्यंत यावर अंतिम निर्णय दिला जाईल. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर सहकारातील या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.