अमरावती : राज्य शासनाने गत ७ एप्रिल रोजी प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेविषयी धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२१ साठी संभाव्य कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. परंतु त्यात काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने सीईओ व शिक्षणाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र घोषित करण्यासाठी २७ एप्रिल २०२१ ही तारीख निश्चित केली आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षक यादी प्रसिद्ध करण्यासाठी २३ एप्रिलचा मुहूर्त निश्चित केला आहे. ही बाब शासन निर्णयाशी विसंगत आहे. शासन निर्णयानुसार जोपर्यंत अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र निश्चित होत नाही, तोपर्यंत सोपे क्षेत्रातील शाळा कोणत्या व अवघड क्षेत्रातील शाळा कोणत्या, हे समजू शकत नाही. त्यामुळे अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र निश्चित झाल्याशिवाय गटशिक्षणाधिकारी हे बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या तयार करू शकत नाही. त्यामुळे संभाव्य कार्यक्रमात बदल करण्यात यावा, संदर्भ दोननुसार संसर्ग २ साठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम यांचेकडे २६ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करून २८ एप्रिलपर्यंत प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे निर्देशित केले आहे. परंतु सध्या कोरोनामुळे कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असून वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई केली आहे. सोबतच सीईओंनी २२ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार अभ्यागताना कार्यालयात प्रवेश बंद करण्याचे बजाविले आहे. त्यामुळे शिक्षकांना संबंधित अधिकारी यांचे कार्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे संवर्ग दोनमधील सर्व शिक्षकांचे अर्ज बीईओ यांच्या पातळीवर जमा करून एकत्रितपणे संबंधित अधिकारी यांचेकडे मान्यतेसाठी सादर करावे व अन्य मुद्याचीही सोडवणूक करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र शिक्षण संघाचे सरचिटणीस किरण पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.