समाजापुढे आदर्श : तेरवीची रक्कम दिली मंदिर उभारणीला धामणगाव रेल्वे : नवरात्र म्हणजे नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याची परंपरा. आयुष्यभर गावातील तारामायची सेवा व नवरात्रीत अखंड उपवास करणाऱ्या आईचे निधन झाल्यानंतर तिने दिलेला शब्द पाळण्यासाठी निस्ताने कुटुंबियांनी रूढींना फाटा देत आईची तेरवी न करता गावातील मंदिराच्या उभारणीसाठी तेरवीची रक्कम प्रदान करून अनोखा आदर्श निर्माण केला. शिदोडी येथील रहिवासी व माजी जि़प़सभापती रामदास निस्ताने यांचे वडिल व्यंकटराव निस्ताने व आई लक्ष्मीबाई यांनी सन १९७३ मध्ये गावावर आलेले दुष्काळाचे संकट परतवून लावले होते़ गावातील शेतकऱ्यांनी त्यावेळी उत्पादीत केलेले धान्य त्यांनी गावाबाहेर जाऊ दिले नाही. सन १९७८ साली गावकऱ्यांना एक मूर्ती सापडली. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरील शेतात तारादेवीच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून हे गावाचे आराध्यदैवत झाले. दररोज तारामातेची पूजाअर्चा करण्याचे कार्य लक्ष्मीबाई निस्ताने यांनी केले. लक्ष्मीबाई निस्ताने यांचा मृत्यू मागील आठवड्यात झाला. सामाजीक कार्यकर्त्या व वात्सल्यसिंधू आई म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मीबाई निस्ताने यांनी पतीच्या मृत्यू तारखेच्याच दिवशीच ३६ वर्षांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मृत्युनंतर तेरवी न करता धार्मिक उपक्रमात तेरवीची रक्कम खर्च करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या शब्दाचा मान राखत आणि मृत्युनंतर त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी तेरवीचा खर्च तारामायच्या मंदिर उभारणीसाठी दान दिली. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे. आयुष्यभर समाजहितासाठी झटणाऱ्या लक्ष्मीचे दातृत्व मृत्युनंतरही समाजाच्या कामी आल्याची गावकरी चर्चा करीत आहेत. आदिशक्तीचा उत्सव सध्या सुरू आहे. अशा स्थितीत अखंड आयुष्य समाजासाठी झटणाऱ्या लक्ष्माबाई निस्ताने यांनी त्यांच्या शिदोडी गावासाठी केलेला त्याग खरोखरीच अतुलनीय आहे. आयुष्यभर लक्ष्मीबार्इंनी ज्या तारामायची आराधना केली त्याच तारामायच्या मंदिराचे पुनर्निर्माण तेरवीच्या पैशांमधून व्हावे, हा त्यांचा हेतू किती निरपेक्ष होता, हे गावकऱ्यांना उमगले. त्यांच्या कुटंबियांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. आणि आता त्यांच्या तेरवीच्या पैशांमधून गावातील मंदिराचे काम मार्गी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)आयुष्यभर केली समाजसेवा लक्ष्मीबाई निस्ताने यांनी आयुष्यभर जमेल त्या मार्गाने समाजसेवा केली. गोरगरिबांना मदत, शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह आदी मार्गांनी त्यांची समाजसेवा सुरूच होती. मृत्युनंतरही त्यांनी हा पायंडा कायम राखला.
लक्ष्मीचे दातृत्व तारामायला अर्पण
By admin | Published: October 04, 2016 12:19 AM