लोकमत इम्पॅक्ट
मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदीच्या सूचना : दुकानदारांना दंड
वरूड : मुख्यमंत्र्यांनी कडक लॉकडाऊन लागू केला असताना शहरात मात्र सर्रास दुकाने उघडी होती. लॉकडाऊन-२ चा कुठेही प्रभाव दिसून आला नव्हता, उलट व्यापारी अधिकाऱ्यांवरच दबावतंत्राचा वापर करीत होते. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात ‘वरूडमध्ये लॉक डाऊनचा फज्जा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला खो' असे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी तडकाफडकी अधिकाºयांची बैठक घेऊन शहरात गस्त घातली. अनेकांवर कारवाई केली. मध्य प्रदेश सीमेवर नाकाबंदीच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार किशोर गावंडे, उपमुख्याधिकारी गौरव गाडगे, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख, एपीआय हेमंत चौधरी यांची लॉकडाऊन कठोर करण्याबाबत संयुक्त बैठक झाली. रस्त्यावर कुणी अकारण, विना मास्क फिरताना दिसल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आले. दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवल्यास कारवाईचे फर्मान उपविभागीय अधिकाऱ्यांनी सोडले आहे. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला विक्रेत्यांनीसुद्धा एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असेही बजावण्यात आले.
बॉक्स
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
वरूडमधे व्यापाऱ्यांनी स्वैराचार अवलंबविला होता. त्याअनुषंगाने शुक्रवारी नगर परिषदेने सात हजार रुपयाचा दंड वसूल केला आणि दोन दुकाने सील केली. यात नवभारत एजंसी, श्री गणेश एजंसी, अनिल राऊत, अनूप जैन, तुषार सावरकर, युसूफ खान, धीरज शीरभाते, जगदंबा एजंसी यांचा समावेश आहे. रामायण स्टोअर आणि हॉटेल सन्मान सील करण्यात आले.
कोट
शहरासह तालुक्यात विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करू. रस्त्यावर गर्दी करणारे तसेच दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवरसुद्धा कायद्याचा बडगा उगारला जात आहे.
किशोर गावंडे, तहसीलदार