मुलभूत सुविधांची पाहणी: संस्था चालकांवर कारवाईचे संकेतअमरावती : आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत, मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरु केले आहे. त्याअनुषंगाने बुधवारी अप्पर आयुक्तांनी धारणी येथील आश्रमशाळांची तपासणी केली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीचे लैगिंक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासनाने सर्वच आश्रमशाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. महिला अधिकाऱ्यांच्या चमुने काही दिवसांपूर्वी शासकीय, अनुदानित आश्रमशाळांची तपासणीकरुन विद्यार्थीेंनीसोबत बंदद्वार चर्चा केली. तसेच आश्रमशाळांमध्ये पायाभूत, मूलभूत सोयीसुविधांची चाचपणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल महिला अधिकारी चमुने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालात आश्रमशाळांमध्ये मूलभूत, पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे नमूद आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालकांना मूलभूत, पायाभूत सुविधांची पुर्तता करण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांची पुर्तता केली अथवा नाही? याची तपासणी करण्यासाठी अप्पर आयुक्त गिरीश सरोदे यांनी बुधवारी धारणी गाठले. धारणीत आश्रमशाळांची तपासणी केली. यात अद्यापही काही आश्रमशाळांमध्ये पायाभूत, मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. काही आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरविण्याला गती मिळाली आहे. तीन आश्रमशाळांना ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)आश्रमशाळांचे संचालक, मुख्याध्यापकांना यापूर्वी बजावलेल्या नोटीसनुसार पायाभूत, मुलभूत सोईसुविधा पुरविण्यात आल्या अथवा नाही, हे तपासले जात आहे. त्यानुसार धारणी येथे पाहणी दौरा करण्यात आला आहे.- गिरीश सरोदे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग
आदिवासी आश्रमशाळांवर अधिकाऱ्यांचे धाडसत्र
By admin | Published: February 02, 2017 12:06 AM