भूविकास बँक : जिल्हास्तरावर कर्मचारी २६ महिन्यांपासून वेतनाविनालोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीभूविकास बँकेच्या मुंबईस्थित शिखर बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनाची भविष्याकालीन तरतूद करण्यात आल्याने ते अधिकारी-कर्मचारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे आहेत का, असा ज्वलंत प्रश्न जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हास्तरावरील भूविकास बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मागील २६ महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाहीत. अमरावतीसह राज्यातील २९ भूविकास बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुमारे २ वर्षांपासून वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत.उल्लेखनीय म्हणजे अमरावती जिल्हा भूविकास बँकेत लिपिक असलेल्या राजेंद्र काळबांडे यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केली होती. सरकारने आता तरी बँकेच्या कर्मचाऱ्यांची वेतनाची थकीत रक्कम द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी उदासीनता या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या २६ महिन्यांपासून अमरावती भूविकास बँकेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापक ते शिपाई तथा ४० जणांना एक पैसाही मिळालेला नाही. दुसरीकडे मुंबईस्थित भूविकास बँकेच्या शिखर बँकेत कार्यरत असलेल्या ४२ कर्मचाऱ्यांचा पुढील ६ वर्षांच्या वेतनासाठी तब्बल ३७ कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. ही सापत्न वागणूक नव्हे का, असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील शिखर भूविकास बँक, मुंबई व २९ जिल्हा भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय १२ मे २०१५ रोजी सरकारने घेतला आहे. बँकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई रक्कम, थकीत पगार व अनुषंगिक सर्व रक्कम कर्जाच्या वसुलीतून दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून येणारी कर्जवसुली फक्त २.७५ कोटी असून ४० कर्मचाऱ्यांना मात्र १४.७५ कोटी रुपये द्यावयाचे आहेत. सततची नापिकी, अस्मानी संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नाही. त्यापार्श्वभूमीवर नुकसानभरपाई आणि वेतनाची थकीत रक्कम कधी मिळेल याबाबत जिल्ह्यासह राज्यातील भूविकास बँकातील अधिकारी कर्मचारी साशंक आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरकारकडून ‘घेणे’ असलेली रक्कम कधी मिळेल, अशा विवंचनेत हे अधिकारी कर्मचारी अडकले असताना आज अचानक या कर्मचाऱ्यांना बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शनिवार त्यांच्यासाठी बँकेतील शेवटचा दिवस ठरणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी आज काळादिवसभूविकास बँकेच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबर हा काळादिवस ठरणार आहे. शुक्रवारी अवसायक गौतम वालदे यांनी अमरावती येथील ४० कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक ताब्यात घेतले असून शनिवारी या कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्यात येणार आहे. सहकार सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी हे कर्मचारी बँकेला कायमचे अलविदा करणार आहेत. या कर्मचाऱ्यांना सक्तीने घरी पाठविण्यात येत असून नुकसान भरपाई मात्र त्यांना देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘दैवगती ही न्यारी बुध्दी, काय करेल बिचारी’ ही संजय महल्ले या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे.
मुंबईमधील अधिकारी राज्यकर्त्यांच्या लाडाचे!
By admin | Published: November 21, 2015 12:17 AM