अमरावती : सात लाख रुपयांमध्ये खरेदी व्यवहार ठरलेल्या शेतीची यापूर्वी अनेकदा विक्री केल्याची घटना येथे घडली. इसार म्हणून २ लाख रुपये दिल्यानंतरही आरोपीने खरेदी करून देण्यास टाळाटाळ चालिवल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी आशिष बरडीया (३४, रा. गणेश काॅलनी) यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी रमेश साधुजी बागोले (५०, रा. प्रियंका कॉलनी, शेगाव, रहाटगाव) विरूद्ध भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला.
अमरावती तालुक्यातील पुसदा येथील १ हेक्टर २१ आर शेतजमिनीचा विक्री व्यवहार ७ लाख रुपयांमध्ये ठरविण्यात आला. बरडीया यांनी त्या व्यवहारापोटी आरोपी बागोले याला २ लाख रुपये इसार दिला. उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. ती जमीन भोगवटादार क्रमांक २ ची असल्याने परवानगी काढून खरेदी करून देऊ, असे आरोपीकडून सांगण्यात आले. मात्र, वारंवार विचारणा केल्यानंतरही खरेदी करून दिली नाही. त्यामुळे बरडीया यांनी वर्तमानपत्रात त्याबाबत जाहिरनामा दिला. त्यानंतर आरोपीने ते शेत यापूर्वीच लक्ष्मीनगर येथील एका गृहस्थाला विकल्याची बाब समोर आली. आरोपीने ते शेत अनेक लोकांना दाखविले. इसारही घेतल्याचे समजले. त्यामुळे एकच मालमत्ता अनेक लोकांना दाखवून, त्या व्यवहारापोटी इसारचिठ्ठी करून अनेकांसह आपलीदेखील फसवणूक झाल्याची तक्रार बरडीया यांनी नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उमक पुढील तपास करीत आहेत.