लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी आदरांजली अर्पण केली. इर्र्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर गर्दीने फुलला होता. ‘अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा...’ असे म्हणत शोषित, पीडित जनांनी आपल्या मुक्तिदात्याला नमन केले.शहरातील इर्विन चौक, भीमटेकडी, शेगाव, बडनेरा नवीवस्ती, अशोकनगर, समता चौकातील पुतळा परिसरात सकाळी ६ पासूनच आदरांजली अर्पण करण्यासाठी अनुयायांनी एकच गर्दी केली होती. आक्रमण संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भंते काश्यप बोधी, भंते कौंडण्य बोधी, भंते प्रज्ञा बोधी, भंते राहुल बोधी व भिक्षुणी धम्मचारिणी आदींच्या भिक्षू संघाने सामूहिक बुद्धवंदना अनुयायांना दिली. यादरम्यान बिगूल वाजवून तमाम शोषितांच्या मुक्तिदात्याला मानवंदना देण्यात आली. रवि गवई यांच्या पुढाकाराने आक्रमण संघटनेने आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता. इर्विन चौकात भीम-बुद्धगीतांच्या कार्यक्रमाची मेजवानी अनुयायांना घेता आली. बडनेरा येथे दी बुद्धिस्ट स्टडीजच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ‘एक पेन-एक वही’ हा उपक्रम राबविण्यात आला.तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदी समाजप्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. पंचशील, निळे झेंडे, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या विक्रीचे स्टॉलदेखील मोठ्या प्रमाणात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे छायाचित्र अंकित असलेली माळ, लॉकेट, साखळी, हँडबेल्ट, मूर्ती आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातर्फे आरोग्य तपासणी व मोफत औषधवाटप, सिकलसेल जनजागृती स्टॉल, महापालिकातर्फे स्वच्छ अॅप डाऊनलोड मार्गदर्शन स्टॉल, जिल्हा माहिती कार्यालयाचे ‘लोकराज्य’ पुस्तक विक्री स्टॉल लक्षवेधी ठरले.इर्विन चौकात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्यावतीने आदरांजली अर्पण करणारे होर्डिंग्ज झळकत होते. विविध गं्रथप्रदर्शन, खेळणी, हार-फुलांची दुकाने आणि अभिवादनासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून आलेल्या अनुयायांच्या भरगच्च गर्दीने इर्विन चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. गुरुवारी सूर्य उगवण्यापूर्वीच आदरांजली वाहण्यासाठी लागलेली रांग रात्री उशिरापर्यंत कायम होती.ग्रंथाचे स्टॉल लक्ष वेधणारे ठरलेइर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दिवसभर प्रचंड गर्दी होती. विविध महापुरूष, विचारवंतांचे ग्रंथ विक्रीचे स्टॉल लक्ष वेधत होते. यंदा ग्रंथाच्या स्टॉलवरून मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री झाली. अनेक भीम अनुयायांनी ग्रंथ खरेदीला प्राधान्य दिल्याचे चित्र अनुभवता आले.
अरे सागरा, भीम माझा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:58 AM
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी आदरांजली अर्पण केली.
ठळक मुद्देमहामानवाला आदरांजली : इर्विन चौकात गर्दी; बाबासाहेबांपुढे अनुयायी नतमस्तक