अमरावती : सर्वच विभागातील शाळामधून ऑनलाईन अध्यापनाला सुरुवात झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी सेतु अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यापूर्वी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली गतवर्षीची पुस्तके शाळेत जमा करण्यात आली असल्याने सेतु अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्याकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नये, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे कालपर्यंत शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत मिळतील का, या संभ्रमात पालक व विद्यार्थी आहेत. शाळा सुरू करून एक महिना झाला आहे. समग्र शिक्षा अभियानमधून वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतात. जवळपास १० ते २० टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली आणि आता सेतु वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली होती. मात्र, ही बाब त्रासदायक असून, यामुळे शाळा व शिक्षकांवर ताण वाढणार आहे. ऑनलाईन शिक्षणासाठीदेखील पुस्तक महत्त्वाचे असून, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके उपलब्ध होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन अभ्यास किती पचनी पडेल, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
आणखी काही दिवस प्रतीक्षा सेतु वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे. असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी व्यक्त केले. शिक्षण विभागाने ३० जूनला बालभारतीला पुस्तकांची मागणी केली आहे. ही पुस्तके जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर व तेथून शाळेत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे शाळेतून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.