अमरावती : तुम्हाला पोलिस बोलावत आहे, अशी बतावणी करून एका वृद्धाला शाळेच्या गल्लीत नेण्यात आले. तेथे आधीच उभ्या असलेल्या तोतया पोलिसाने त्या वृद्धाकडील अंगठी फसवणूक करवून लांबविली. अंगठीऐवजी बारीक दगड निघाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने पोलिस ठाणे गाठले. १ एप्रिल रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास साईनगर येथील दीपा इंग्लिश स्कूलच्या गल्लीत हा प्रकार घडला. याप्रकरणी विनायक नांदूरकर (७०, रा. चंद्रावती कॉलनी) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी अज्ञात दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्या दोन तोतयांनी २५ हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी हातचलाखीने पळविली.
विनायक नांदूरकर हे शनिवारी सकाळी त्यांच्या नातीला शाळेमधून आणण्याकरिता साईनगर परिसरात आले. त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याकडे आला. तुम्हाला पोलिसवाला बोलावत आहे, असे सांगून तो त्यांना दीपा इंग्लिश स्कूलच्या बाजूच्या गल्लीत घेऊन गेला. त्या ठिकाणी अन्य अनोळखी इसम आधीच होता. या परिसरामध्ये चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. तुम्ही जवळील सोन्याची अंगठी काढून खिशात ठेवा, असे त्याने बजावले. त्यामुळे नांदूरकर यांनी बोटातील अंगठी काढली. ती ठेवण्याकरिता त्या अनोळखी इसमाने त्याच्याजवळील कागद काढला. ती सोन्याची अंगठी त्या कागदामध्ये ठेवतो, असे भासवून हातचलाखीने ती काढून घेतली. त्यामध्ये दगड टाकून तो कागद नांदूरकर यांच्या खिशात ठेवला.
पाठलाग निष्फळ
काही क्षणात त्यापैकी एकाने दुचाकी जवळ केली. हे पाहताच नांदूरकर यांनी स्वत:च्या पँटच्या खिशात अंगठी ठेवलेला कागद पाहिला असता, त्यामध्ये अंगठी दिसून आली नाही. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या आरोपीने तेथून पळ काढला. ‘पकडा पकडा’ म्हणेपर्यंत थोड्या अंतरावर ठेवलेल्या दुचाकीने दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. त्यादरम्यान नांदूरकर हे त्या भामट्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहू शकले नाहीत. त्यांनी दुपारी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.