अमरावती : सरकारी निमसरकारी शिक्षक -शिक्षकेतर समन्वय समिती 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. शुक्रवारी (दि. 17) नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत विशाल मोर्चाल सुरुवात झाली. यावेळी संपकर्त्यांनी डोक्यावर 'एकच मिशन जुनी पेन्शन'ची टोपी घालून व पांढरा ड्रेस परिधान करून मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने संपकरी सहभागी झाले.
दुपारी 12 वाजता नेहरू मैदान येथून मोर्चाची सुरुवात झाली. नेहरू मैदान येथून राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, मालविय चौक, इविन चौक, गर्ल्स हायस्कूल चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डी.एस.पवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
मोर्चाला सुरुवातीस सरकारी/ निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची सुकाणू समिती, समन्वय समितीमधील घटक संघटनाचे पदाधिकारी समोर व त्यानंतर महिला व त्यानंतर विविध विभागाचे कर्मचारी याप्रमाणे मोर्चाची रचना होती. दरम्यान, ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी आर्त हाक देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज खोळंबले आहे.