विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या निकालात महाविकास आघाडीनं भाजपाला जोरदार धक्का दिला. कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता भाजपाला अन्य २ ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात प्रामुख्याने नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार पराभूत झाले. या निकालात अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकणारे धीरज लिंगाडे हे जायंट किलर ठरलेत. त्यांनी माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले धीरज लिंगाडे यांचा ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेत अमरावतीची तिकीट दिली. धीरज लिंगाडे हे ठाकरे गटाचे नेते होते. बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर अनेकांनी पक्ष सोडला. परंतु धीरज लिंगाडे हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. धीरज लिंगाडे हे आधीपासून पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत होते. या मतदारसंघासाठी शिवसेनेने दीड वर्ष आधीच तयारी सुरू केली होती.
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर धीरज लिंगाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही लढाई आम्ही जिंकलो याचा आनंद होत आहे. संपूर्ण महाविकास आघाडी ताकदीने लढलो आहे. मतदारांनी चांगला कौल दिला आहे. आजच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोडदौड सुरु झाली आहे. मी लवकरच मातोश्रीवर देखील जाणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेणार असल्याची माहिती धीरज लिंगाडे यांनी दिली. तसेच माझा विजय हा सर्व संघटनांमुळे झाला आहे. विजय हा नेहमी मतदारांचा असून जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा धीरज लिंगाडे यांनी केली.
मी काँग्रेस विचारधारेचा-
गेल्या १२ वर्षापासून रणजित पाटील या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. परंतु यावेळी मतदार ठरवलं त्यांना काय करायचंय. ही जागा मविआत काँग्रेसकडे होती. सगळ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला होता. मी काँग्रेस विचारांचा, माझे घराणे काँग्रेसचेच आहे. माझे वडील रामभाऊ लिंगाडे काँग्रेस पदाधिकारी होते. पूर्वी मी काँग्रेस नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी घेतली असं धीरज लिंगाडे यांनी म्हटलं होतं.
अमरावतीत अपेक्षेप्रमाणे मते पडली नाहीत-
अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत त्यामुळे नक्कीच त्याचा विचार हा पक्ष करेल. त्याठिकाणी अवैध झालेल्या मतांची संख्या मोठी आहे. त्यात आमच्या उमेदवाराला पडलेल्या अवैध मतांची संख्या जास्त आहे. त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल अशी प्रतिक्रिया या निकालावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.