गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीपीसीआर टेस्टमुळे देशभर नाव झालेल्या अमरावती शहराचा डंका जगभर वाजणार आहे. पुणे, मुंबईनंतर विदर्भातील पहिली ‘डब्ल्यूजीएस’ (व्होल, जिनोम सिक्वेन्सिंग सिस्टीम) अमरावती येथे सुरू होण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर या विषयीचा प्रस्ताव आता प्रक्रियेत आहे. याशिवाय ‘एस’ जीन शोधण्यासाठी आवश्यक दोन किट्चा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दोन दिवसांत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘डब्ल्यूजीएस’ सिस्टीम असणाऱ्या प्रयोगशाळेकडे ‘डब्लूएचओ’चे लक्ष असते. त्यामुळे अमरावतीची लॅब चर्चेत येण्याची शक्यता आहे. सध्या देशात अशा प्रकारच्या दहा प्रयोगशाळा आहेत. यामध्ये राज्यात एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरोलॅजी) व एनसीसीएस (नॅशनल सेंटर फॉर सेल्स सायन्सेस) पुणे व मुंबई येथे कस्तुरबा सेंटरला एक लॅब सुरू करण्यात आलेली आहे. अमरावतीचे केंद्र सुरू झाल्यानंतर फारतर चार दिवसांत ओमायक्रॉनचे निदान होणार आहे. आता अन्य प्रयोगशाळेवर ताण येत असल्याने नमुन्यांची तपासणी व्हायला दहा ते बारा दिवस लागत असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सध्या या प्रयोगशाळेत ‘एस’ जीन शोधण्यासाठी आवश्यक किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वच पॉझिटिव्ह व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पहिले दिल्लीला व आता पुणे येथे एनआयव्हीला पाठविण्यात येत आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत पाठविलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती आहे. पुण्याच्या लॅबमध्ये ट्रॅव्हल हिस्ट्री व त्यांचे कॉन्टॅक्ट लिस्टमधील नमुन्यांंची तपासणी पहिल्यांदा केली जात असल्याने अन्य नमुन्यांची तपासणी काहीशी मागे राहत असल्याचे वास्तव आहे.
अशी आहे सध्या प्रक्रियाजिल्ह्यातील पॉझिटिव्ह नमुने पुण्याला तपासणीला गेल्यानंतर त्याचे सिक्वेन्सिंग इन्साकॉडला देतात. त्यांच्याद्वारे हा डेटा नॅशनल सेंटर फाॅर डिसिज कंट्रोलला दिला जातो व त्यानंतर ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयास देण्यात येत असते व त्यानंतर सर्व माहिती संबंधित सेंटरला दिली जाते. यामध्ये ओमायक्रॉनची नोंद झाल्यास आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
यूके स्टेनमध्ये आढळला ‘एस’ जीन
यापूर्वी दुसऱ्या लाटेत यूके स्टेन बी.१.१.७ मध्ये ‘एस’ जीनचे म्युटेशन आढळून आलेले आहे. त्याला ६९.७० म्युटेशन म्हणतात. आता ‘ओमायक्रॉन’मध्येही एस जीन आढळून येत आहेत. ‘एस’ जीनमुळे फक्त ओमायक्रॉनचे संशयित रुग्ण नोंद केले जातात. त्यानंतर विशिष्ट कुरिअरच्या मार्फत संबंधित नमुना एनआयव्हीला पाठविला जातो व तो दुसऱ्याच दिवशी पोहोचतो. याबाबत त्यांना फोनद्वारे तशी माहिती दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
‘एस’ जीन शोधण्याची किट २.५० लाखांचीयेथील प्रयोगशाळेत पॅाझिटिव्ह नमुन्यांमधील ‘एस’ जीन शोधण्यासाठी आवश्यक किट उपलब्ध नसल्यामुळे दोन किट मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. यावर सीएसची स्वाक्षरी झालेली आहे. झेडपीचे डीएचओ, कॅफो व सीईओ व त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. यासाठी पाच लाखांच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात येणार आहे.
येथील प्रयोगशाळेसाठी दोन किट्चा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. याशिवाय डब्लूजीएस साठीचा प्रस्ताव आता प्रक्रियेत आहे. मंजुरी मिळाल्यास विदर्भात अमरावती येथे ओमायक्रॉन नमुने तपासणी केल्या जाईल.- डॉ. प्रशांत ठाकरेसमन्वयक, विद्यापीठ लॅब