अमरावती : पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यात स्पर्धा परिक्षा अभ्यासिका उभारल्या गेल्या आहेत. खाकी केवळ गुन्हे आणि गुन्हेगारांवर अंकुश घालण्याकरीताच नाही, तर तिला सामाजिक बांधिलकीची देखील जोड असल्याचे अभ्यासिकेच्या यशस्वी प्रयोगातून अधोरेखित झाले आहे. या १२ अभ्यासिकेत सध्या ५५० तरूण स्पर्धा परिक्षांचे धडे गिरवत आहे. या अभ्यासिकेत ५० हजारांच्या वर विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहे. त्यातून १६ विद्यार्थी शासकीय तथा खासगी सेवेत निवडले गेले आहे.
अचलपूर पोलीस ठाण्यातील अभ्यासिकेचे सहा विद्यार्थी सरकारी बॅंक, आर्मी, आसाम रायफल, रेल्वे, आरबीआयमध्ये निवडले गेले आहेत. तर चांदूरबाजार ठाण्यातील अभ्यासिकेतील तीन तरुण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, पोलीस व अग्निविरमध्ये भरती झाला आहे. येवद्यातील अभ्यासिकतील एक जण पोस्टमन बनलाय तर दुसरा पीसीएसमध्ये निवडला गेला आहे. तर वरूड पोलीस ठाण्यातील अभ्यासिकेत धडे गिरविणारे दोघे पोस्टमन, एक जण म्हाडा तर दोघे सेंट्रल रेल्वेत निवडले गेले. जिल्ह्यातील विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरीता धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदुर बाजार, दर्यापूर, येवदा, चांदूररेल्वे, मोर्शी, वरूड, ब्राम्हणवाडा, मंगरूळ चव्हाळा व तिवसा अशा १२ पोलीस ठाण्यात पोलीस लायब्ररी उघडण्यात आल्या आहेत. त्या पुर्ण क्षमतेने सुरू आहेत.
उत्साहवर्धक वातावरण
अभ्यासिकेमध्ये वेगवेगळया विषयावरील स्पर्धा परीक्षा तयारीची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे तेथे स्पर्धा परीक्षेचे वैशिष्टयपूर्ण व उत्साहवर्धक वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थ्यांची आपआपसात अभ्यास करण्याची निकोप स्पर्धा सुरू झाली आहे. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरीता अभ्यासाशिवाय पर्याय नाही याची सर्व अभ्यासिकेतील विदयार्थामध्ये जाणीव निर्माण झाल्याचे निरिक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.
जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्याच्या आवारात अभ्यासिका निर्माण करण्यात आल्या आहेत. विद्यार्थांना स्पर्धा परिक्षाविषयक पुस्तके तर उपलब्ध आहेतच, मात्र ज्यांनी युपीएससी, एमपीएससीत यश मिळविले, त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन देखील केले जाते. विद्यार्थ्यांना नि:शुल्क अभ्यासिका उपलब्ध झाल्याने अभ्यासिकेकडे ओढा वाढला आहे.
- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती