बडनेरा (अमरावती) : मनमाड-दौंड सेक्शनमध्ये डबल लाईन नॉन इंटरलॉकिंगचे काम असल्याने पुणे मार्गाकडच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने प्रवाशांना गावाकडे सणासाठी जाताना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. विदर्भात मोठ्या संख्येत पुण्याहून प्रवासी येत असतात.
विदर्भातून जाणारी गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस ११०४० क्रमांकाची गाडी १९ व २० ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. पुणे-नागपूर २२१४१ क्रमांकाची गाडी तसेच नागपूर-पुणे या दोन्ही गाड्या २० ऑक्टोबर रोजी रद्द आहे. पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस २२१२३ क्रमांकाची गाडी २१ ऑक्टोबर रोजी रद्द असेल. साईनगर-दादर एक्स्प्रेस, पुणे-निजामाबाद, निजामाबाद-पुणे, भुसावळ-पुणे, पुणे-भुसावळ या गाड्यादेखील रद्द राहणार आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे गाड्या रद्द असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. रेल्वे प्रशासनाच्या या धोरणाविरोधात प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.
पुणे मार्गावर जेमतेम गाड्या सुरू असल्याने या गाड्यांवर प्रवाशांची एकच झुंबड आहे. दिवाळी सणासाठी पुण्याकडून मोठ्या प्रमाणात प्रवासी येण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याहून विदर्भात दिवाळीच्या सुट्यांमध्ये मोठा प्रवासी वर्ग येत असतो. यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्या रद्द करू नये, अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.